शानभाग विद्यालयातील पोषण आहार गैरव्यवहाराची होणार चौकशी

जळगाव प्रतिनिधी । येथील ब. गो. शानभाग विद्यालयाने शालेय पोषण आहार योजनेतील गैरव्यवहाराबाबत एका पालकाने केलेल्या तक्रारीची दखल घेत याबाबत उच्चस्तरीय चौकशी समितीची नेमणूक करून सखोल चौकशी करण्यासह केलेल्या कार्यवाहीचा अहवाल संचालनालयात तत्काळ सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

याबाबत वृत्त असे की, विवेकानंद प्रतिष्ठान संचालित सावखेडा येथील ब. गो. शानभाग विद्यालयाने शालेय पोषण आहार योजनेचा लाभ घेतलेला आहे; मात्र विद्यार्थांना त्याचे वाटप होत नसल्याबाबत पालक रवींद्र शिंदे यांनी शासनाकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवरून २०१८ मध्ये तत्कालीन सीईओ कौस्तुभ दिवेगावकर यांनी धान्यासह अन्य मालाच्या झालेल्या पुरवठ्याबाबत चाळीसगाव, भडगाव, मुक्ताईनगर, जळगाव या चार तालुक्यांची चौकशी लावली होती. २०१८मध्ये शालेय पोषण आहार योजनेच्या घोटाळ्याच्या झालेल्या चौकशीतही शानभाग विद्यालय दोषी आढळले होते.

गेल्या १० वर्षांपासून हा प्रकार सुरू असल्याने चौकशी समिती नेमून ही चौकशी कालमर्यादेत पूर्ण करावी, शालेय दस्तावेज ताब्यात घ्यावे, गैरव्यवहार प्रकरणी शाळेची मान्यता रद्द करावी, यासंबंधी अधिकारी यांच्याविरुद्ध फौजदारी कारवाई करून गुन्हे दाखल करावे यासह चौकशीकामी वेळोवेळी माझे म्हणणे सादर करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणीही तक्रारदार पालक रवींद्र शिंदे यांनी केली आहे.

Protected Content