Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

बंद करून व्यापार्‍यांसह सर्वसामान्यांना वेठीस का धरतात : जैन यांचा सवाल ( व्हिडीओ )

जळगाव सचिन गोसावी । आज पुकारण्यात आलेल्या देशव्यापी संपाला जळगावच्या प्रमुख बाजारपेठ प्रमाणे सराफ बाजारातही संमिश्र प्रतिसाद लाभला. अर्थात, बहुतांश दुकाने बंद असली तरी काही दुकाने मर्यादीत प्रमाणात उघडी होती. दरम्यान, या संदर्भात लाईव्ह ट्रेंडस न्यूजला दिलेल्या विशेष मुलाखतीत जळगाव जिल्हा सराफ असोसिएशनचे अध्यक्ष गौतमचंद जैन यांनी कोणतीही समस्या ही चर्चेने सुटत असते. यामुळे चर्चेचा मार्ग सोडून व्यापार्‍यांसह सर्वसामान्य नागरिकांना वेठीस धरणे चुकीचे असल्याची भूमिका मांडली.

दिल्लीत सुरू असणार्‍या शेतकर्‍यांच्या आंदोलनास पाठींबा दर्शविण्यासाठी आज देशभरात बंद पाळण्यात आला. महाराष्ट्रात याला राज्यात सत्ताधारी असणार्‍या महाविकास आघाडीने पाठींबा दिला असल्याने याचा व्यापक परिणाम दिसून आला. संपाला बर्‍यापैकी प्रतिसाद लाभला. बाजारपेठेतील बहुतेक दुकाने व व्यावसायिक प्रतिष्ठाने बंद असल्याचे आज दिसून आले.

हाच परिणाम आज सराफ बाजारावरही दिसून आला. बाजारातील बहुतेक दुकाने बंद असली तरी काही मर्यादीत प्रमाणात उघडी होती. या संदर्भात लाईव्ह ट्रेंडस न्यूजला दिलेल्या विशेष मुलाखतीत ळगाव जिल्हा सराफ असोसिएशनचे अध्यक्ष गौतमचंद जैन यांनी आजच्या संपाला संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचे नमूद केले.

गौतमचंद जैन यांनी याप्रसंगी उठसुट बंद करण्यापेक्षा चर्चेतून मार्ग काढावा अशी अपेक्षा व्यक्त केली. ते म्हणाले की, संपामुळे व्यापार्‍यांसह अनेकांचे नुकसान होत असते. याच्या काळात अनेकांची गैरसोय देखील होते. आमदार-खासदारांसारख्या नेत्यांच्या माध्यमातून चर्चा करून हा प्रश्‍न सोडवावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तर संपामुळे जळगावच्या सराफ बाजारात सुमारे पाच ते सात कोटी रूपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज देखील गौतमचंद जैन यांनी व्यक्त केला.

खालील व्हिडीओत पहा गौतमचंद जैन नेमके काय म्हणालेत ते ?

Exit mobile version