Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

बनावट सोन्याचे दागिने तारण ठेवून कर्ज काढले; गुन्हा दाखल

FIR

जळगाव प्रतिनिधी । खामगाव सहकारी बँकेत तब्बल २८ तोळ्यांचे बनावट सोन्याचे दागिने तारण ठेवून कर्ज काढण्याचा प्रकार उघडकीस आला असून याबाबत तीन जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत वृत्त असे की, नवीपेठेतील खामगाव अर्बन बँकेत ४ मे २०१७ रोजी ललित बाळकृष्ण जाधव व आरती ललित जाधव यांनी सोन्याच्या बांगड्या, मंगळसूत्र आदी एकूण २८५.६८० ग्रॅम सोने तारण ठेवून ४ लाख ५० हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. कर्ज प्रक्रिया पार पाडत असतांना बँकेने योगेश माधव वाणी यांना सोने परीक्षणासाठी नियुक्त केले होते. त्यांनी सोन्याच्या दागिन्यांचे परीक्षण करून लेखी मूल्यांकन अहवाल बँकेला दिला होता. बँकेने ते दागिने सीलबंद पाकिटात बँकेच्या सुरक्षा कोठडीत ठेवले होते. दोन्ही कर्जदारांना दिलेल्या ४ लाख ५० हजार रुपये कर्ज भरण्याची मुदत ४ मे २०१८ पर्यंत होती. मात्र त्यांनी कर्जफेड केली नाही.

यामुळे ३० जून रोजी बँकेने अंतिम सूचनापत्र पाठवून दागिन्यांच्या लिलावातून कर्ज वसूल करण्याचे सूचित केले. त्यानंतर दागिने विक्रीसाठी ३० सप्टेंबर रोजी लिलाव जाहीर करण्यात आला. पहिल्या लिलावाला प्रतिसाद मिळाला नाही. दुसर्‍या लिलावासाठी काही लिलावधारक आले. त्यानंतर सुरक्षा कोठडीत असलेले तारण सोन्याचे दागिने बँकेने लिलावासाठी बाहेर काढले. बँकेने किशोर जडे यांच्याकडून दागिन्यांची तपासणी करून मूल्यांकन करण्यात आले. ते दागिने बनावट असल्याचे मूल्यांकनात आढळून आले. यामुळे बँक व्यवस्थापकांनी जळगाव येथील शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

यानुसार, बनावट दागिने तारण ठेवून बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी व्यवस्थापक गोपाळ महाले यांच्या फिर्यादीवरून ललित जाधव, आरती जाधव व योगेश माधव वाणी यांच्याविरुद्ध २० ऑक्टोबर रोजी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. यातील ललित जाधव याला अटक करण्यात आली आहे.

Exit mobile version