Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मराठा विद्याप्रसारक मंडळ स्व. नरेंद्र अण्णा गटाकडेच ! : कोर्टाचा निकाल

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्हा मराठा विद्याप्रसारक मंडळ मर्यादीत अर्थात मविप्रवर दिवंगत नरेंद्र अण्णा पाटील यांच्या गटाचाच हक्क असल्याचा महत्वपूर्ण निकाल आज जिल्हा न्यायालयाने दिला आहे. यामुळे भोईटे गटाला धक्का बसला असून पाटील गटाच्या लढाईला यश मिळाले आहे.

जळगाव जिल्हा विद्याप्रसारक मंडळ मर्यादीत या संस्थेच्या २०१५ साली झालेल्या निवडणुकीत नरेंद्रअण्णा पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने दणदणीत विजय संपादन करून भोईटे गटाचे साम्राज्य खालसा केले होते. यानंतर मात्र भोईटे गटाने पुन्हा एकदा समांतर कार्यकारिणी स्थापन करून संस्थेवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला होता. यातून वाद झाले होते. यात दोन्ही गटांनी एकमेकांच्या विरूध्द तक्रारी देखील दाखल केल्या होत्या.

नूतन मराठातील वादामध्ये तत्कालीन मंत्री गिरीश महाजन यांनी भोईटे गटाला रसद पुरविण्याचे आरोप करण्यात आले होते. अलीकडच्या काळात तर अ‍ॅड. विजय भास्कर पाटील यांनी या प्रकरणी महाजन, सुनील झंवर आणि भोईटे गटावर अतिशय गंभीर आरोप केले होते. यात आ. गिरीश महाजन हे भोईटे गटाला हाताशी धरून नूतन मराठाची जमीन हडप करण्याच्या प्रयत्नात असल्याचा आरोप करण्यात आला होता.

दरम्यान, नूतन मराठातील वाद हा कोर्टात पोहचला होता. यात संस्थेवर नेमके कुणाचे नियंत्रण राहील ? हा प्रमुख मुद्दा होता. यावर सर्वोच्च न्यायालयाने आज निकाल देऊन जळगाव जिल्हा विद्याप्रसारक मंडळ मर्यादीत या संस्थेवर दिवंगत नरेंद्रअण्णा पाटील यांच्या गटाचे वर्चस्व राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

Exit mobile version