महावितरणचे कर्मचारी आक्रमक; कामबंद आंदोलनाचा इशारा

जळगाव प्रतिनिधी । Electric Distribution महावितरणचे अधिक्षक अभियंता मोहंमद फारूक यांना आमदार मंगेश चव्हाण व समर्थकांनी मारहाण केल्याच्या निषेधार्थ महावितरण कर्मचार्‍यांच्या संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला असून कामबंद आंदोलनाचा इशारा दिला आहे.

शुक्रवारी सायंकाळी चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह शेतकर्‍यांनी महावितरणचे Electric Distribution अधिक्षक अभियंता मोहंमद फारूक यांना वीज जोडणी बंद केल्याबद्दल जाब विचारला. याप्रसंगी फारूक यांना खुर्चीला बांधून बाहेर आणण्यात आले. तर कार्यालयास कुलूप देखील लावण्यात आले. त्यांच्यासोबत झालेल्या या गैरवर्तनामुळे आमदार मंगेश चव्हाण आणि सोबतच्या लोकांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, आमदार चव्हाण आणि समर्थकांच्या या कृत्याचे अतिशय तीव्र पडसाद उमटले आहेत. काल रात्रीच Electric Distribution Workers वीज वितरणच्या कर्मचारी संघटनांनी परिमंडळ कार्यालयाच्या बाहेर आंदोलन करत याचा निषेध केला. वीज देयकांची वसुली हा राज्य सरकारच्या उर्जा खात्याकडून आलेल्या निर्देशांचा भाग असून या कामात व्यत्यय आणण्यापासून ते अधिकारी व कर्मचार्‍यांना मारहाण होत असल्याच्या घटना या अतिशय चिंताजनक असल्याचे संघटनांनी नमूद केले आहे. सरकारने या प्रकरणी कठोर कारवाई करावी आणि वीज वितरणच्या कर्मचार्‍यांना संरक्षण द्यावे अशी मागणी करण्यात आली आहे.

जळगावच्या वीज परिमंडळ कार्यालयातील या कृत्याचा स्टेट इलेक्ट्रीसिटी वर्कर्स फेडरेशन आणि सब-ऑर्डिनेट इंजिनिअर्स संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी तीव्र निषेध केला असून काम बंद आंदोलनाचा इशारा दिला आहे.

काय आहे प्रकरण ?

शुक्रवार दिनांक २६ मार्च रोजी सायंकाळी जळगावच्या सहकार औद्योगीक वसाहतीमध्ये असणार्‍या वीज परिमंडळाच्या कार्यालयात चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण हे तालुक्यातील शेतकर्‍यांसह अधिक्षक अभियंता मोहंमद फारूक यांच्या भेटीसाठी आले. याप्रसंगी त्यांनी तालुक्यातील सात हजार शेतकर्‍यांच्या वीजचे कनेक्शन तोडल्याबद्दल विचारणा केली. याप्रसंगी फारूकी यांना हमरातुमरी करण्यात आली. त्यांना खुर्चीला बांधून थेट शेतकर्‍यांच्या बांधावर नेण्याचा प्रयत्न झाला. मात्र एमआयडीसी पोलीस पोहचल्याने हे शक्य झाले नाही. तसेच आंदोलकांनी वीज परिमंडळ कार्यालयात कुलूप ठोकले.

या प्रकरणी लागलीच आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यात आमदार मंगेश चव्हाण आणि त्यांच्या सोबतच्या लोकांचा समावेश होता. तर रात्री या संदर्भात औद्योगीक वसाहत पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात अभियंता फारुक यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार आमदार चव्हाण यांच्यासह ४० ते ५० जणांवर भारतीय दंड विधान कलम ३५३, ३३२, १४३, १४७, १४९, ३५१, २९४, २६९, १८८, मुंबई पोलिस कायदा कलम १३५ व आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील कलम ५१ ते ६० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमदार चव्हाण यांच्यासह ३१ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

Protected Content