Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सिव्हीलमध्ये लसीकरणाचा ‘ड्राय रन’: मिलींद काळे यांनी घेतली पहिली लस ! ( व्हिडीओ )

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील नर्सिंग कॉलेजमध्ये आज कोरोनाच्या लसीचा ‘ड्राय रन’ ( रंगीत तालीम) यशस्वीपणे पार पडला. यात प्रशासनात कार्यरत असणारे मिलींद काळे यांना सर्वप्रथम लस घेण्याचा बहुमान मिळाला.

याबाबत वृत्त असे की, जळगावात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील नर्सिंग कॉलेजमध्ये आज सकाळी कोरोनाच्या लसीकरणाची रंगीत तालीम सुरू करण्यात आली. पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत सुरू झालेल्या या ड्राय रनमध्ये महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद व सिव्हील सर्जन डॉ. एन.जी. चव्हाण यांनी उपस्थितांना चाचणीबाबतची माहिती दिली.

शासकीय वैद्यकिय महाविद्यालयाच्या प्रशासकीय विभागात कार्यरत असणारे अधिकारी मिलींद काळे यांनी सर्वप्रथम कोरोनाची लस घेण्याचा बहुमान पटकावला. कोविडची लस ही पूर्णपणे सुरक्षित असून कुणीही न घाबरता लस घेण्याचे आवाहन मिलींद काळे यांनी याप्रसंगी केले. तर, श्री काळे यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

दरम्यान, काळे यांच्यानंतर मेडिकल कॉलेजमध्ये अन्य कोरोना योध्द्यांना ही लस देण्यात आली. यानंतर पत्रकारांशी बोलतांना पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, जिल्ह्यात चार ठिकाणी कोरोनाचा ड्राय रन घेण्यात आलेला आहे. आगामी काळात शासनाच्या नियमांनुसार नागरिकांना लसीकरण करण्यात येणार आहे. तथापि, नागरिकांनी लस घेतल्यानंतरही मास्क वापरायचे आवाहन ना. पाटील यांनी केले.

सिव्हील सर्जन डॉ. एन.जी. चव्हाण म्हणाले की, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील २५ कर्मचार्‍यांनी नोंदणी केली असून त्यांना आजच्या सरावात लस देण्यात आली. यात लस देतांना शासनाने आखून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करण्यात आले आहे. लस दिल्यानंतर रूग्णालयात अर्धा तास निरिक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे. ही लस पूर्णपणे सुरक्षित असून यानंतर देखील मास्क वापरायचे आहे. साधारणपणे १५ जानेवारीपर्यंत जिल्ह्यात लस उपलब्ध होणार असून यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असल्याचे प्रतिपादन देखील त्यांनी केले.

खालील व्हिडीओत पहा कोरोना लसीच्या रंगीत तालिमीचा वृत्तांत

Exit mobile version