Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

‘पन्नास खोके, एकदम ओके’ छापलेले टि-शर्ट वाटा ! : ‘ते’ सर्व पराभूत होतील : डॉ. सतीश पाटील

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी Exclusive Report | माजी मंत्री डॉ. सतीश पाटील यांनी आजच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या मेळाव्यात आगामी निवडणुकीसाठी एक अफलातून संकल्पना प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्यासमोर मांडली आहे.

आगामी निवडणुकांच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे आज जिल्ह्यात आगमन झाले आहे. त्यांच्या उपस्थितीत पक्षाचा जिल्हा मेळावा आयोजीत करण्यात आला आहे. याप्रसंगी बोलतांना माजी मंत्री डॉ. सतीश पाटील यांनी आक्रमक भाषण करत काही मुद्देदेखील मांडले.

डॉ. सतीश पाटील म्हणाले की, राज्यात आपले सरकार असतांना काही पदाधिकारी सोशल मीडियातून नेत्यांसोबतचे फोटो शेअर करत होते. सरकार जाताच ते गायब झाले आहेत. सोशल मीडियापेक्षा प्रत्यक्षात काम करणे आवश्यक असल्याचे परखड मत त्यांनी मांडले. तसेच त्यांनी राज्यात सरकार गेले असले तरी लोकांमध्ये एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकार्‍यांमध्ये खूप रोष आहे. अगदी काल पोळा साजरा करतांना लोकांनी बैलांच्या अंगावर ‘पन्नास खोके एकदम ओके’ असे छापले असल्याचे त्यांनी सांगताच उपस्थितांमध्ये हशा पिकला.

डॉ. सतीश पाटील म्हणाले की, आदित्य ठाकरे यांच्या दौर्‍याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. मूळचे शिवसैनिक हे ठाकरे यांच्या सोबतच आहेत. आणि महाविकास आघाडी म्हणून आपण त्यांच्या सोबत आहोत. पुढील निवडणुकीसाठी पक्षाने मेहनत करून प्रचार तर करायचाच आहे, पण निवडणुकीच्या काळात ‘पन्नास खोके एकदम ओके’ लिहलेले १० हजार टि-शर्ट छापून ते मतदारसंघात वाटून द्यावे. असे झाल्यास जिल्ह्यातील शिंदे यांच्या सोबत गेलेले पाचही आमदार पराभूत होतील असा दावा डॉ. सतीश पाटील यांनी केला. या पाचही ठिकाणी राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून येतील असे प्रतिपादन देखील त्यांनी केले. अर्थात, त्यांच्या भाषणाला उपस्थितांनी जोरदार दाद दिली.

याप्रसंगी व्यासपीठावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील, आमदार एकनाथराव खडसे, आमदार अनिल भाईदास पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, जिल्हाध्यक्ष रवींद्रभैय्या पाटील, माजी आमदार संतोष चौधरी, माजी आमदार साहेबराव पाटील, माजी आमदार मनीष जैन, माजी आमदार दिलीप वाघ, दिलीप सोनवणे, महिला जिल्हाध्यक्षा वंदना चौधरी, महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी, माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्‍वर महाजन, युवक जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, एजाज मलीक आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

Exit mobile version