Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

डॉ. राधेश्याम चौधरी म्हणतात…आता पुन्हा ‘जळगाव फर्स्ट !’

जळगाव प्रतिनिधी । सध्या भाजपवासी असलेले ज्येष्ठ नेते तथा अ‍ॅक्टीव्हीस्ट डॉ. राधेश्याम चौधरी आता पुन्हा एकदा ‘जळगाव फर्स्ट’ या मंचच्या माध्यमातून सक्रीय होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून राजकीय जीवनात सक्रीय झालेल्या डॉ. राधेश्याम चौधरी यांनी अल्पावधीतच आपल्या कामाची छाप पाडली आहे. यानंतर ‘जळगाव फर्स्ट’ या मंचच्या माध्यमातून त्यांनी अनेक यशस्वी आंदोलने करून जनतेचे लक्ष वेधून घेतले. या माध्यमातून झालेले समांतर रस्त्यांचे आंदोलन खूप गाजले असून आता हा महत्वाचा प्रश्‍न मार्गी लागला आहे.

दरम्यान, गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीच्या ऐन तोंडावर डॉ. राधेश्याम चौधरी यांनी काँग्रेसची साथ सोडून भाजपमध्ये प्रवेश केला तेव्हा सर्वांना आश्‍चर्य वाटले होते. मात्र जवळपास एक वर्ष होऊनही ते भाजपमध्ये फारसे रूळले नसल्याचे दिसून येत आहे. मध्यंतरी त्यांना महापालिकेत स्वीकृत सदस्यपदी घेण्यात येणार असल्याची चर्चा झाली तरी याबाबत अद्यापही निर्णय झालेला नाही. यामुळे डॉ. चौधरी हे भाजपला रामराम ठोकण्याच्या मनस्थितीत असल्याची माहिती आता समोर आली आहे.

तर, डॉ. राधेश्याम चौधरी यांनी भाजप त्याग करण्याचा सध्या तरी विचार नसला तरी आपण ‘जळगाव फर्स्ट’ या मंचच्या माध्यमातून पुन्हा एकदा सक्रीय होणार असल्याची माहिती दिली आहे. यामुळे अर्थातच, ते पुन्हा एकदा विविध जनहितकारी आंदोलनांचा धडाका पुन्हा सुरू करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Exit mobile version