Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

दाणाबाजारात लहान वाहनांना मिळणार प्रवेश: उपमहापौरांचे यशस्वी प्रयत्न ( व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी । सध्या सुरू असणार्‍या कडक निर्बंधांच्या कालावधीत दाणा बाजारात लहान चारचाकी वाहनांना प्रवेश देण्यात आला असून उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी व्यापार्‍यांसोबतच्या बैठकीत त्यांच्या मागणीवरून हा निर्णय घेतला आहे. तसेच अवजड वाहनांसाठी जुन्या नगरपालिकेच्या जागेवर व्यवस्था करण्यात आली आहे.

सध्या राज्य सरकारने ब्रेक द चेनच्या अंतर्गत कडक निर्बंध लागू केले आहेत. याच्या अंतर्गत दाणा बाजारातील व्यापार्‍यांना सकाळी सात ते अकरा या कालावधीत दुकाने उघडण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. तर दाणा बाजारातील माल लोड-अनलोड करण्यासाठी दुपारी बारा ते एक ही वेळ देण्यात आलेली आहे. मात्र यामुळे व्यापार्‍यांची अडचण होत आहे. विशेष करून बाहेर गावावरून आलेल्या व्यापार्‍यांना दाणाबाजारातून माल नेण्यासाठी अडचणी येत आहेत. या परिसरात लहान वाहनांना देखील परवानगी नसल्याने व्यापार्‍यांच्या शिष्टमंडळाने आज उपमहापौर कुलभूषण पाटील यांची भेट घेतली. यात व्यापारी महामंडळाचे अध्यक्ष प्रवीण पगारिया यांच्यासह अन्य व्यापार्‍यांचा समावेश होता.

उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी उपायुक्त संतोष वाहुळे यांच्या उपस्थितीत व्यापार्‍यांच्या शिष्टमंडळासोबत बैठक घेतली. यात व्यापार्‍यांनी लहान वाहनांना दाणा बाजारात प्रवेश मिळावा अशी मागणी केली. उपमहापौर पाटील यांनी यानुसार उपायुक्तांशी चर्चा केल्यानंतर ही मागणी मान्य करण्यात आली. यामुळे आता दाणा बाजारात लहान चारकाची वाहने जाऊ शकणार आहेत. दरम्यान, दाणा बाजारात येणार्‍या अवजड वाहनांच्या पार्कींगची समस्या देखील असल्याचे व्यापार्‍यांनी सांगितले. यामुळे उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी जुन्या नगरपालिकेच्या जागेवर दाणा बाजारात येणार्‍या अवजड वाहनांच्या पार्कींगची व्यवस्था करून दिली. या अनुषंगाने आता या जागेवर दुपारी बारा ते दोन या वेळेत अवजड वाहनांची अनलोडींग करता येणार आहे.

खालील व्हिडीओत पहा या बैठकीबाबतचा वृत्तांत.

Exit mobile version