Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

गिरीश महाजनांच्या कर्तृत्वामुळेच रस्त्यांची दयनीय अवस्था- देवेंद्र मराठे

जळगाव प्रतिनिधी । गिरीश महाजन पालकमंत्री असतांना जिल्ह्याकडे दुर्लक्ष केल्याने रस्ते खराब झाले असून यातूनच आजचा अपघात घडल्याची टीका एनएसयुआयचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी केली आहे. या प्रकरणी महाजनांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे.

आज माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांच्या वाहनाला मागून दुचाकीस्वाराने धडक दिली असून या अपघातात तो गंभीर जखमी झाला आहे. या पार्श्‍वभूमिवर, एनएसयुआयचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी एका निवेदनाच्या माध्यमातून गिरीश महाजन यांच्यावर टीका केली आहे. यात त्यांनी म्हटले आहे की, पाचोरा तालुक्यातील लोहारी- वरखेडे गावाच्या दरम्यान माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांच्या कारने एका दुचाकीस्वाराला उडविले.
यात अपघातात वरखेडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी बी. सी. पवार हे जखमी झाले आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत.

माजी मंत्री गिरीश महाजन यांनी मंत्री असताना मागील पाच वर्षात कुठल्याही प्रकारचा जिल्ह्यामध्ये विकास काम केलेलं नसल्यामुळे आज रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. जिल्ह्यातील रस्त्यांमध्ये केवळ आणि केवळ खड्डे ही फक्त माजी मंत्री गिरीश महाजन यांची जिल्ह्याला देण आहे. या खड्ड्यांमुळे आधी सर्व जनता त्रस्त असतानाच आज महाजन याच्या वाहनाने प्राथमिक आरोग्य केंद्राचा कर्मचारी जखमी झाला आहे. यामुळे
माजी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी जळगाव जिल्हा एनएसयूआयच्या वतीने जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी मागणी केली आहे.

Exit mobile version