Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कैद्यांना रसद पुरवणारा चेतन भालेराव अटकेत

जळगाव प्रतिनिधी | कैद्यांना सर्व प्रकारची रसद पुरवणारा चेतन अनिल भालेराव उर्फ माया याला पोलिसांनी अटक केली आहे.

खुनाच्या गुन्ह्यात पाच महिने कारागृहात राहून आलेला तसेच कारागृहाच्या मागच्या बाजूला राहणारा ‘माया’ या संशयितास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. माया कारागृहाच्या मागे राहतो. पैसे घेऊन कारागृहातील सर्व कैद्यांना सर्व प्रकारची रसद तो पुरवतो. कारागृहातून पळून गेलेल्या तीन कैद्यांसाठी त्यानेच सिमकार्ड आत फेकले होते. याच गुन्ह्यात त्याला अटक करण्यात आली.

चेतन उर्फ माया अनिल भालेराव (वय २२, रा.गणेशनगर, कारागृहाच्या मागील परिसर) या संशयितास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. गेल्या वर्षी जिल्हापेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका तरुणाचा खून झाला होता. या खुनात माया संशयित आहे. गुन्ह्यात अटक झाल्यानंतर तो पाच महिने कारागृहात होता. त्यामुळे त्याला कारागृहातील संपूण परिसराची माहिती आहे. तेथील कर्मचाऱ्यांशी त्याची ओळख आहे. जामिनावर बाहेर आल्यानंतर त्याने पैसे घेऊन कारागृहातील कैद्यांना रसद पुरवण्यास प्रारंभ केला.

मायाचे घर कारागृहाच्या मागेच आहे. असल्याने त्याला सर्व परिसराची जाण होती. यातच कारागृहातून सुशील मगरे, गौरव व सागर पाटील या तिघांनी पळून जाण्याचा प्लॅन केला. त्यासाठी त्यांना कारागृहात पिस्तूल, काडतूस, मोबाइल, सिमकार्ड अशा चार वस्तू काही जणांनी पुरवल्या. यात टाल्कम पावडरच्या डब्यातून आलेले मोबाइलचे सिमकार्ड मायाने आतमध्ये फेकले होते. त्यासाठी कैद्यांच्या बाहेर असलेल्या मित्रांनी मायाला काही रक्कमदेखील दिली. दरम्यान, या गुन्ह्यात आत्तापर्यंत गौरव पाटील, सागर पाटील, जगदीश पाटील, नागेश पिंगळे, अमित चौधरी, करण पावरा, डिगंबर कोळी व कमलाकर पाटील या आठ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर माया यालादेखील अटक करण्यात आली. तो सध्या पोलिस कोठडीत आहे.

Exit mobile version