Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

नगरसेविका ज्योती चव्हाण ‘बेपत्ता’ ! : पतीची पोलिसात तक्रार

जळगाव प्रतिनिधी । एकीकडे महापालिकेत सत्तांतराचे नाट्य रंगले असतांना भाजपच्या नगरसेविका सौ. ज्योती बाळासाहेब चव्हाण बेपत्ता झाल्याची फिर्याद त्यांचे पती बाळासाहेब चव्हाण यांनी रामानंदनगर पोलीस स्थानकात दाखल केल्याने खळबळ उडाली आहे.

सध्या भाजप आणि भाजपमधील फुटीर नगरसेवकांचा गट हा अज्ञात ठिकाणी आहे. उद्या ऑनलाईन सभेत महापौर आणि उपमहापौर यांची निवड होणार असल्यामुळे अज्ञात ठिकाणी राहून सुध्दा मतदान करता येणार असल्याने दोन्ही बाजूंनी ही काळजी घेतली आहे. दरम्यान, यात आता अनेक नाट्यमय घटना घडत आहेत. यात आता भाजपच्या नगरसेविका ज्योती चव्हाण बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांचे पती बाळासाहेब चव्हाण यांनी रामानंदनगर पोलीस स्थानकात दाखल केल्याने खळबळ उडाली आहे.

या फिर्यादीत म्हटले आहे की, सौ. ज्योती बाळासाहेब चव्हाण या काही नगरसेविकांसोबत दिनांक १४ मार्च रोजी रात्री नाशिक येथे रवाना झाल्या. यानंतर १५ मार्च रोजी दुपारी चार वाजता एका नगरसेविकेच्या मोबाईलवरून त्यांनी आपल्या कुटुंबाशी शेवटचा संपर्क साधला. यानंतर त्यांनी कुटुंबाशी संपर्क साधला नसल्यामुळे रामानंदनगर पोलीस स्थानकात मिसींगची तक्रार दाखल करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, प्रस्तुत प्रतिनिधीने याबाबत फिर्यादी बाळासाहेब चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आपण रामानंदनगर पोलीस स्थानकात मिसींगची फिर्याद दिल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. तसेच आता ते नाशिकच्या दिशेने निघाले असून पारोळ्यापर्यंत पोहचले असल्याची माहिती देखील त्यांनी दिली.

Exit mobile version