Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

संविधानाचा विचारच देशाला जोडणारा-उज्जैनवाल

जळगाव प्रतिनिधी । कोणत्याही भेदाच्या पलीकडे जात एक भारतीय म्हणून आपली ओळख ही संविधानाची देन असून हा विचारच देशाला जोडणारा असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार तथा लाईव्ह ट्रेंडस् न्यूजचे सल्लागार संपादक सुरेश उज्जैनवाल यांनी केले. येथील अँग्लो उर्दू स्कूल व हाजी नूर मोहंमद चाचा ज्युनिअर कॉलेजमध्ये संविधान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

येथील अँग्लो उर्दू स्कूल व हाजी नूर मोहंमद चाचा ज्युनिअर कॉलेजमध्ये संविधान दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अंजुमने तालीमुल मुसलमीन संस्थेचे अध्यक्ष हाजी गफ्फार मलीक तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार तथा लाईव्ह ट्रेंडस् न्यूजचे सल्लागार संपादक सुरेश उज्जैनवाल, भारत मुक्ती मोर्चाचे अध्यक्ष मुकुंद सपकाळे, मन्यार बिरादरीचे जिल्हाध्यक्ष फारूक शेख, लाईव्ह ट्रेंडस् न्यूजचे संपादक शेखर पाटील, सलीम खान, प्राचार्य डॉ. शेख आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रारंभी संस्थेतर्फे उपस्थितांचे स्वागत करण्यात आले. यानंतर उपस्थितांनी संविधानाच्या प्रस्तावनेचे वाचन करून याचे पालन करण्याची शपथ घेतली. प्राचार्य डॉ. शेख यांनी प्रास्ताविकातून या कार्यक्रमाबाबत विवेचन केले. हनीफ सर यांनी संविधानाबाबत माहिती दिली. शेखर पाटील यांनी कोणताही धर्म वा भाषा हे तोडण्याचे काम करत नसून जोडण्याचे काम करतो. यामुळे उर्दू माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी देखील मराठी सारख्या व्यवहारातील भाषांना आत्मसात करण्याचे आवाहन केले. फारूक शेख यांनी संविधानाच्या वाटेवरून आपण चालण्याची आवश्यकता विशद केली. मुकुंद सपकाळे यांनी अतिशय प्रवाही शब्दांमध्ये संविधानाधकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना घटना समितीत जाण्यासाठी झालेल्या घडामोडींचा उहापोह केला.

ज्येष्ठ पत्रकार तथा लाईव्ह ट्रेंडस् न्यूजचे सल्लागार संपादक सुरेश उज्जैनवाल यांनी आपल्या भाषणातून संविधान हेच आपल्यासाठी महत्वाचे असून प्रत्येक विद्यार्थ्याने याचे अध्ययन करणे आवश्यक असल्याचे नमूद केले. हाजी गफ्फार मलीक यांनी स्वखर्चाने संविधानाच्या २०० प्रतिंचे वाटप करण्याचा घेतलेला निर्णय हा स्तुत्य असल्याचेही त्यांनी नमूद केले. तर अध्यक्षीय भाषणात गफ्फार मलीक यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अनेकदा मुस्लीम धर्मियांनी केलेल्या मदतीचा उल्लेख करत सर्वांनी संविधानाच्या मार्गावरून चालण्याचे आवाहन केले.

खाली पहा या कार्यक्रमाचा व्हिडीओ वृत्तांत.

Exit mobile version