Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

चौपदरीकरणाच्या नियमबाह्य कामाबाबत पोलिस स्थानकात तक्रार

जळगाव प्रतिनिधी । शहरातून जाणार्‍या महामार्गाचे काम हे विहीत आराखड्यानुसार होत असल्याचा आरोप करून सामाजिक कार्यकर्ते फारूक शेख यांनी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.

सध्या शहरातून जाणार्‍या राष्ट्रीय महामार्गाचे रूंदीकरण सुरू आहे. हे काम प्राधिकरण दिल्ली मुख्य कार्यालयाच्या अहवालाप्रमाणे होत नसून प्रकल्प संचालक आदेशाचे उल्लंघन करीत आहेत. त्या अनुषंगाने भारतीय दंड विधान कायदा कलम १६६, २६८, ३०४ अ याप्रमाणे कारवाई करण्याबाबत फारुख शेख यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

या तक्रारीत म्हटले आहे की, महामार्गावर स्थानिक गरजा, जागेवरील आवश्यकता, सुरक्षा, समांतर रस्ते, अस्तित्वात असलेल्या रोड ड्रेनेज, रुंदीकरण, आवश्यक सेवा, अंडरपास व फुटवेअर ब्रिजचा समावेश असावा. अस्तित्वातील असलेल्या ६० मीटर रुंदीचा महामार्ग पूर्णपणे विकसित करावा. त्यात प्रामुख्याने दुभाजकासह दोन्ही बाजूला साडेसात मीटरचे रस्ते तयार करावेत. उड्डाणपूल, चौक सुधारणा, पादचार्‍यांसाठी व वाहनांसाठी अंडरपास तयार केले जावे. अजिंठा चौक, इच्छादेवी चौक यांना विशिष्ट पद्धतीने तयार करण्याचे लेखी आदेश देऊन सुद्धा जळगाव राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक चंद्रकांत सिन्हा हे आदेशाचे उल्लंघन करीत आहे.

यात पुढे नमूद केले आहे की, महामार्गावर कोणत्याही प्रकारे रस्ता सुरक्षेचा वापर केला जात नाही. रिफ्लेक्टर, साईन बोर्ड, ड्रायव्हरटेशन बोर्ड, रोड साईन, डेलीनेटर्स, बॅरिगेट कोनस, पायलोमस लाईट, वॉर्निंग साईन, माहितीपर फलक यांचासुद्धा समावेश नाही. या प्रकरणी तक्रार शेख यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता कलम ३९ प्रमाणे एमआयडीसी पोलीस स्थानकात तक्रार दिली असून भारतीय दंड विधान कायदा कलम १६६, २६८, ३०४ अ याप्रमाणे कारवाई करण्याची मागणी केली आहे. याची एक प्रत जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना देखील देण्यात आलेली आहे.

Exit mobile version