Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मराठा विद्याप्रसारकमध्ये ताबा घेण्यावरून वाद पेटला

जळगाव प्रतिनिधी । कालच जिल्हा न्यायालयाने Maratha Vidya Prasarak Mandal मराठा विद्याप्रसारक मंडळ मर्यादीत संस्थेवर नरेंद्र पाटील गटाचा हक्क असेल असा निर्णय दिल्यानंतर आज लागलीच दोन्ही गटांमध्ये वाद पेटला. संस्थेचा ताबा घेण्यावरून झालेल्या वादात एका कारचे काच फोडण्यात आल्यानंतर येथे पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.

मराठा विद्या प्रसारक मंडळ मर्यादीत या संस्थेतील वादावर काल जिल्हा न्यायालयाने निकाल दिला होता. जळगाव जिल्हा विद्याप्रसारक मंडळ मर्यादीत या संस्थेच्या २०१५ साली झालेल्या निवडणुकीत नरेंद्रअण्णा पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने विजय संपादन केला होता. यानंतर मात्र भोईटे गटाने पुन्हा एकदा समांतर कार्यकारिणी स्थापन करून संस्थेवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला होता. यातून वाद झाले होते. यात दोन्ही गटांनी एकमेकांच्या विरूध्द तक्रारी देखील दाखल केल्या होत्या. तर हा वाद नंतर न्यायालयात पोहचला होता.

संस्थेतील वादाची पार्श्‍वभूमि काहीच बदललेली नसतांना आणि पहिल्यांदा दिलेले आदेश निष्प्रभ झालेले नसतांना एकाच तहसीलदाराने एकाच मुद्यावर दोन वेगळे आदेश का दिलेत ? अशी बाजू पाटील गटातर्फे न्यायायापुढे मांडण्यात आली होती. त्यावर न्यायालयाने पुन्हा या संस्थेवर नरेंद्र पाटील यांच्या गटाचेच संचालक मंडळ वैध असल्याचा निकाल काल दिला.

यानंतर आज पाटील गटाचे संचालक कार्यकारिणीचा ताबा घेण्यासाठी गेले. तेव्हा भोईटे आणि पाटील गटामध्ये वाद झाला. यात एका इनोव्हा कारचे मागील बाजूचे काच फोडण्यात आले. दोन्ही गटांमधील वाद विकोपाला जाण्याआधीच पोलीसांनी नूतन मराठामध्ये धाव घेतल्याने अनर्थ टळला. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा Maratha Vidya Prasarak Mandal नूतन मराठामध्ये कडेकोट पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता.

Exit mobile version