Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

बीएचआर घोटाळ्याचे भुसावळ कनेक्शन : जाणून घ्या पूर्ण माहिती

भुसावळ प्रतिनिधी । बीएचआर प्रकरणात भुसावळ येथील मातब्बर नेते मुन्ना तेली यांच्या मुलास अटक करण्यात आल्याने स्थानिक राजकारणात खळबळ उडाली आहे. यामुळे जळगाव व जामनेरच्या पाठोपाठ या घोटाळ्याचे भुसावळ येथील कनेक्शनही उघड झाले आहे.

याबाबत वृत्त असे की, बीएचआर गैरव्यवहार प्रकरणात आता सात जणांना अटक करण्यात आली असून यात जळगाव व जामनेरसह इतर ठिकाणच्या मातब्बरांचा समावेश असल्याने खळबळ उडाली आहे. आज पहाटे जळगावातील व्यावसायिक भागवत भंगाळे, जामनेर येथील छगन झालटे व जितेंद्र पाटील, भुसावळ येथील आसीफ तेली, पाळधी येथील जयश्री मणियार आणि संजय तोतला व अजून एकाला अटक केली आहे. पुणे येथील आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकारी भाग्यश्री नवटके यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

या प्रकरणात भुसावळ येथील आसीफ मुन्ना तेली यांची अटक ही लक्षणीय ठरली आहे. ते स्थानीक राजकारणातील वजनदार व्यक्तीमत्व मानल्या जाणार्‍या मुन्ना तेली यांचे चिरंजीव आहेत. मुन्ना तेली हे स्वत: अतिशय यशस्वी व्यावसायिक आहेत. त्यांचा मोठा मुलगा आसीफ हा मोठा कंत्राटदार आहे. तर लहान मुलगा आशीक हा राजकारणात हळूहळू सक्रीय होऊ लागला आहे. मुन्ना तेली हे गेल्या नगरपालिका निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडून आले होते. मात्र नंतर त्यांना आश्‍चर्यकारकरित्या भाजपचे गटनेते बनविण्यात आले. नगरपालिकेतील सूत्रे ज्या मोजक्या मंडळीच्या हाती होती त्यात मुन्ना तेली यांचा समावेश आहे. काही महिन्यांपूर्वी त्यांनी भाजपच्या गटनेतेपदाचा राजीनामा दिला होता. तर त्यांचे चिरंजीव आशीक तेली यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला आहे. यामुळे मुन्ना तेली हे स्वत: राष्ट्रवादीत सक्रीय होणार असल्याची चर्चा होती. यातच आज त्यांच्या मुलास ताब्यात घेण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

आसीफ तेली यांच्या अटकेमुळे बीएचआर घोटाळ्यातील भुसावळचे कनेक्शन उघड झाले आहे. यात काही मालमत्तांच्या खरेदी संशयास्पद असल्याची चर्चा आधीच होत होती. आजच्या कारवाईमुळे यावर शिक्कामोर्तब झाल्याचे मानले जात आहे.

Exit mobile version