Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

बीएचआरच्या घोटाळ्याची कुंडली सांगताहेत सरकारी वकील अ‍ॅड. केतन ढाके ! ( व्हिडीओ)

जळगाव सचिन गोसावी Exclusive । बीएचआर सहकारी बँकेत प्रशासक आणि दलालांनी मिळून केलेला घोटाळा तुफान गाजत असतांनाच यातील मूळ अपहाराचा खटला देखील सुरू आहे. जळगाव जिल्हा न्यायालयात याची ८ डिसेंबरला सुनावणी होणार आहे.

बीएचआर संस्थेचे संस्थापक प्रमोद रायसोनी उर्फ अंकल यांनी ठेविदारांना चुना लावल्याने ते पाच वर्षापासून कारागृहात आहेत. त्यांनी नेमका कसा अपहार केला ? त्यांच्यावर कोणते गुन्हे दाखल आहेत ? त्यांच्या तपासात आजवर काय आढळून आले आहे ? ८ डिसेंबरला कशावर सुनावणी होणार आहे ? या सर्वांची कुंडली आपल्याला सांगत आहेत जिल्ह्याचे सरकारी वकील केतन ढाके !

याप्रसंगी अ‍ॅड. केतन ढाके म्हणाले की, जामनेर येथे ५ फेब्रुवारी १९९६ रोजी भाईचंद हिराचंद बिगर शेती पतसंस्थेची स्थापना करण्यात आली. याचे कार्यक्षेत्र हे स्थानीक होते. हीच पतसंस्था २००४ मध्ये नागरी पतसंस्थेत परिवर्तीत झाली तर २००७ मध्ये याला मल्टी-स्टेट बँकेचा दर्जा मिळाला. तेव्हापासून देशभरात विविध शाखांच्या माध्यमातून याचे कामकाज सुरू झाले.

दरम्यान, संचालक मंडळाच्या गैरकारभारामुळे ठेविदारांच्या ठेवी अडकल्या. यामुळे जळगावच्या रामानंदनगर पोलीस स्थानकात शिवराम चौधरी यांनी २ जानेवारी २०१५ रोजी दाखल केला पहिला गुन्हा केला. यानंतर संचालक व प्रमुख कर्मचार्‍यांविरूध्द राज्यभरात तब्बल ८० गुन्हे दाखल करण्यात आली. या सर्व गुन्ह्यांचा तपास हा सीआयडीकडे वर्ग करण्यात आला असून तेव्हापासून संचालक हे कारागृहातच आहेत. दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाने हे सर्व गुन्हे जळगाव न्यायालयात एकाच ठिकाणी चालविण्याचे निर्देश दिले आहेत. यानुसार जळगावला याची सुनावणी होत आहे.

अ‍ॅड. केतन ढाके पुढे म्हणाले की, ८ डिसेंबर रोजी जळगाव न्यायालयात या खटल्यांची एकत्रीत सुनावणी होणार आहे. कोरोनाच्या आपत्तीमुळे ही सुनावणी व्हिडीओ कॉन्फरन्सींगच्या माध्यमातून होणार आहे. यातील ७० गुन्ह्यांचा तपास सीआयडीने तर १० गुन्ह्यांचा तपास स्थानिक पोलीस स्थानकाच्या निरिक्षकांनी केला असल्याची माहिती त्यांनी दिली. यात ८ डिसेंबरला १२ नवीन आरोपपत्र दाखल करण्यात येणार आहेत. या प्रकरणात १४ प्रमुख आरोपी असून एक महिला आरोपी अद्यापही फरार आहे.

याप्रसंगी अ‍ॅड. केतन ढाके म्हणाले की, बीएचआरचा संस्थापक प्रमोद रायसोनी याने नियमबाह्य कर्ज वाटप केले. तसेच त्याने आपल्या कर्मचार्‍यांच्या नावाने भल्या मोठ्या रकमांचे कर्ज घेऊन ते आपल्याला शून्य टक्के व्याजदराने मिळाल्याचे इन्कमटॅक्स खात्याच्या विवरणात दर्शविले. यात अनेक बेनामी ठेवी असून सिक्युरिटी न घेता कर्ज वाटप करण्यात आले आहे. यामुळे बीएचआर गोत्यात आली असून यातील दोषींविरूध्द विविध कलमांच्या अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या अनुषंगाने जळगाव जिल्हा न्यायालयात ८ डिसेंबर रोजी सुनावणी होणार असल्याची माहिती अ‍ॅड. केतन ढाके यांनी दिली.

खालील व्हिडीओत पहा अ‍ॅड. केतन ढाके यांनी दिलेली सविस्तर माहिती.

Exit mobile version