गफ्फार मलीक यांना ऑनलाईन शोकसभेत आदरांजली

जळगाव प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गफ्फार मलीक यांना ऑनलाईन या प्रकारातील शोकसभेत विविध पक्षांच्या मान्यवरांनी आदरांजली अर्पण केली.

राष्ट्रवादीच्या अल्पसंख्यांक आघाडीचे माजी प्रदेशाध्यक्ष तथा पक्षाचे ज्येष्ठ नेते गफ्फार मलीक यांचे नुकतेच निधन झाले. त्यांना पक्षाच्या जिल्हा कार्यालयात आयोजीत कार्यक्रमात आदरांजली अर्पण करण्यात आली. यात राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते ऑनलाईन या प्रकारात सहभागी झाले.

याप्रसंगी खासदार सुप्रीया सुळे म्हणाल्या की, गफ्फारभाईंनी संघटना बांधणीस सहकार्‍यांची समजूत काढणे ही कामे मलिक यांनी यशस्वीपणे केली. ते सर्वसमावेश नेते होते. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री ना. जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीच्या वाटचालीतील त्यांच्या योगदानाचा गौरव केला. मुस्लिम समाजाला शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे काम त्यांनी केले असल्याचे त्यांनी नमूद केले. तर राष्ट्रवादीचे प्रवक्ते तथा मंत्री ना. नवाब मलिक यांनी अल्पसंख्यांक समाजाच्या हितासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केल्याचे सांगितले.
तर पक्ष कार्यालयात माजी मंत्री एकनाथराव खडसे, माजी विधानसभाध्यक्ष अरूणभाई गुजराथी, माजी मंत्री गुलाबराव देवकर, आमदार राजूमामा भोळे, आमदार अनिल भाईदास पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड संदीप पाटील, अ‍ॅड. जाकीर मेमन, इकरा संस्थेचे अध्यक्ष डॉ. करीम सालार, प्रतीभा शिंदे, मणियार बिरादरीचे फारूक शेख, माजी आमदार मनिष जैन, अ‍ॅड. जमिल देशपांडे, अरविंद मतकरी, इजाज मलिक यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या.

गफ्फार मलीक यांच्या माध्यमातून राजकीय क्षेत्रातील एक मातब्बर व सामान्य कार्यकर्त्यांपासून ते मोठ्या पदाधिकार्‍यांपर्यत सर्वांना सोबत घेऊन चालणारा नेता हरपला आहे. त्यांच्या राजकीय क्षेत्रातील योगदान व अनुभवामुळे राजकीय क्षेत्राची मोठी हानी झाल्याची खंत देखील अनेकांनी व्यक्त केली.

Protected Content