वायरमनच्या मृत्यू प्रकरणी कठोर कारवाई – उर्जामंत्री

जळगाव प्रतिनिधी । भडगाव येथे कर्तव्यावर असलेल्या वीज वायरमनच्या हत्येप्रकरणी संबंधीत दोषींवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती आज राज्याचे उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिली आहे.

याबाबत वृत्त असे की, काल पाचोरा-भडगाव मतदारसंघात शिवसेनेतर्फे वीज वितरण कंपनीच्या कार्यालयांना ताला ठोको आंदोलन करण्यात आले. या अनुषंगाने भडगाव येथे आंदोलन संपल्यानंतर सात जणांनी महावितरणाच्या कार्यालयात बळजबरीने प्रवेश करून उप कार्यकारी अभियंता अजय अशोक धामोरे यांना मारहाण सुरू केली. त्यांच्या मदतीसाठी वायरमन गजानन प्रताप राणे हे धावून गेले असता या टोळक्याने त्यांनाही जबर मारहाण केली. यात राणे यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकारामुळे महावितरणच्या कर्मचार्‍यांमध्ये अतिशय भितीचे वातावरण निर्मित झाले आहे.

दरम्यान, या प्रकरणी आज सकाळी उर्जा मंत्री नितीन राऊत यांनी ट्विट केले आहे. यात मयत गजानन राणे यांना श्रध्दांजली अर्पण करत त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात सहभागी असल्याच्या संवेदना व्यक्त केल्या आहेत. तर या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची ग्वाही देखील उर्जामंत्र्यांनी दिली आहे. तर, या भयंकर घटनेचे आता राज्यभरात पडसाद उमटण्याचे संकेत मिळाले आहेत.

Protected Content