ब्रेकींग : दुध संघ निवडणूक- जगदीश बढेंना धक्का; ठकसेन पाटील रिंगणात !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जिल्हा दुध संघाच्या होऊ घातलेल्या निवडणुकीत रावेर तालुक्यातून बिनविरोध निवडून येण्याची शक्यता असणार्‍या जगदीश बढे यांना विभागीय उपनिबंधक सहकारी संस्था ( दुग्ध) यांनी धक्का दिला असून ठकसेन पाटलांचे नामनिर्देशनपत्र ग्राह्य धरले आहे. यामुळे येथून बढे यांची बिनविरोध निवड रद्द झाली असून येथे निवडणूक होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

याबाबतचे वृत्त असे की, जिल्हा दुध संघातून रावेरमधून चिनावल येथील ठकसेन भास्कर पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. तथापि, त्यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आला होता. याच्या विरोधात त्यांनी पोलीस स्थानकात तक्रार दिली होती. तसेच यासोबत त्यांनी विभागीय उपनिबंधक सहकारी संस्था (दुग्ध) नाशिक यांच्याकडे धाव घेतली होती. यात त्यांनी आपला उमेदवारी अर्ज रद्द करण्याचा जिल्हा उपनिबंधक संतोष बिडवई यांच्या निर्णयावर आक्षेप घेत आपल्याला निवडणूक लढविण्याची परवानगी द्यावी अशी मागणी केली होती.

दरम्यान, ठकसेन पाटील यांच्या अर्जावर आज सुनावणी झाली. याप्रसंगी सुनावणीत ठकसेन पाटील यांच्यातर्फे विशाल सोनवणे यांनी युक्तीवाद केला. यात ते म्हणाले की, ठकसेन पाटील हे स्वत: वसंत सहकारी दुध उत्पादक सोसायटीचे प्रतिनिधी आहेत. संस्थेतर्फे करण्यात आलेल्या दुधाच्या पुरवठ्याचा दाखला त्यांना ७ नोव्हेंबर २०२२ रोजी देण्यात आला आहे. यात २०१९-२० या वर्षासाठी ८९७५१ लीटर, २१-२२- ४२६३८ लीटर याप्रमाणे असल्याची माहिती त्यांना देण्यात आली होती. मात्र त्यांनी दुध संघासाठी नामनिर्देशन पत्र भरले असता त्यांना कमी दुध पुरवठा असल्याचे कारण दाखवून पाटील यांचा अर्ज बाद करण्यात आला. यानंतर ठकसेन पाटील यांनी स्वत: संस्थेमध्ये तपासणी केली असता सन २०१९-२० या वर्षात १६१५२९ लीटर; सन २०२०-२१ वर्षात ८६९८४ लीटर, तर २०२१-२२ या वर्षात ८१०६० लीटर इतक्या दुधाचा पुरवठा करण्यात आल्याचे दिसून आले. यानंतर जिल्हा दुध संघात याबाबत ओरड केल्यानंतर त्यांना योग्य दाखला देण्यात आला. अर्थात जगदीश बढे यांना बिनविरोध निवड करण्यासाठी व्यवस्थापकीय संचालक मनोज लिमये यांनी ठकसेन पाटील यांना खोटा दाखला देऊन फसवणूक करण्यात आल्याचा आरोप विशाल सोनवणे यांनी या युक्तीवादात केला.

यावर जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा विभागीय उपनिबंधक सहकारी संस्था ( दुग्ध) सुरेंद्र तांबे यांनी निकाल दिला. यात त्यांनी ठकसेन पाटील यांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य धरून त्यांचे नामनिर्देशनपत्र ग्राह्य धरण्यात यावे असा निकाल दिला. यामुळे रावेरमधून जगदीश बढे यांच्या विरोधात ठकसेन भास्कर पाटील हे राहतील असे स्पष्ट झाले आहे.

Protected Content