Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पालकमंत्र्यांच्या प्रयत्नांनी चिंचोली येथील ‘मेडिकल हब’चा मार्ग मोकळा

मुंबई ( प्रतिनिधी ) : जळगाव शहरानजीक चिंचोली येथे मंजूर होऊन गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबीत असणार्‍या मेडिकल हब अर्थात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आरोग्य संकुलाचा प्रश्‍न अखेर पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या पुढाकाराने मार्गी लागणार आहे. ना. पाटील यांनी आज वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्यासोबत मंत्रालयात विशेष बैठक घेतली. यात या मेडिकल हबचे नकाशे आणि डीपीआरसह अन्य माहिती जमा करण्याचे निर्देश देण्यात आले असून यासोबत तांत्रीक आणि अतांत्रीक या दोन्ही संवर्गातील बदल्या यंदा रद्द करण्यासही मान्यता देण्यात आली आहे. या माध्यमातून जिल्ह्यातील आरोग्य सेवेचे बळकटीकरण होणार असून याचा नागरिकांना लाभ होणार आहे.

याबाबत वृत्त असे की, जळगाव जिल्हा हा अंदाजे पन्नास लाख लोकसंख्या असणारा मोठा जिल्हा असून जिल्ह्यातील बहुतांश जनता ग्रामीण भागात राहते. तसेच जिल्ह्यातून तीन राष्ट्रीय महामार्ग जात असून अपघातांचे प्रमाण देखील जास्त आहे. या पार्श्‍वभूमिवर, आरोग्यसेवेची निकड लक्षात घेऊन २०१७ साली मौजे चिंचोली, ता. जळगाव येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अर्थात गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला परवानगी मिळाली. तर, नियमानुसार मेडिकल कॉलेजला संलग्न हॉस्पीटल असावे म्हणून तात्पुरत्या स्वरूपात जिल्हा सामान्य रूग्णालयाला वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न करण्यात आले. तसेच प्रत्यक्षातील मेडिकल कॉलेज देखील सिव्हीलच्याच आवारात सुरू करण्यात आले. तर मेडिकल कॉलेजच्या नावाने चिंचोली शिवारातील ६७ एकर जमीन अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांच्या नावे करण्यात आली. मात्र याचा पुढे काहीही पाठपुरावा करण्यात न आल्यामुळे मेडिकल कॉलेजचा प्रश्‍न प्रलंबीतच राहिला.

दरम्यानच्या काळात कोविडची आपत्ती सुरू झाल्याने जिल्ह्याच्या आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड तणाव आला. यातच अखील भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या निकषानुसार मेडिकल कॉलेजमध्ये आवश्यक असणार्‍या पायाभूत सुविधा सिव्हील हॉस्पीटलमध्ये पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाहीत. तसेच मुख्य इमारात, संलग्न विविध विभाग, विद्यार्थ्यांची वसतीगृहे हे एकाच परिसरात बांधण्यासाठी येथे पुरेशी जागा देखील नाही. कॉलेजने पदव्युत्तर (एम.डी./एम.एस. आदी) अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी परवानगी मागितली असली तरी यासाठी असणार्‍या निकषांची पूर्तता करण्यात न आल्याने अडचणी होत आहेत. तर विद्यार्थ्यांना स्वतंत्र लायब्ररी, सेमिनार हॉल, क्रीडांगण आदी नसल्यानेही अडचण आहेत. मात्र या प्रकरणी पाठपुरावा करण्यात न आल्याने गत चार वर्षांपासून मेडिकल हबचे काम रखडले आहे. याची दखल घेत. राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी आज मंत्रालयात वैद्यकीय शिक्षणमंत्री ना. अमित देशमुख आणि वरिष्ठ अधिकार्‍यांसह बैठक घेतली.

या बैठकीत जळगाव येथील मेडिकल हबबाबत इत्यंभूत चर्चा झाली. यानंतर ना. अमित देशमुख यांनी या प्रकल्पाला गती देण्यासाठी दोन महत्वाचे निर्देश जारी केलेत. यात सदर मेडिकल हब हे दोन टप्प्यात पूर्ण होणार असून यातील पहिला टप्पा ६६७ तर दुसरा टप्पा ४५० कोटी रूपयांचा असेल असे स्पष्ट करण्यात आले आहे. यातील पहिल्या टप्प्यात मेडिकल कॉलेजची मुख्य वास्तू, ६५० खाटांचे अद्ययावत रूग्णालय, विद्यार्थी-विद्यार्थीनींचे वसतीगृह, कर्मचार्‍यांची निवासस्थाने, लायब्ररी, संलग्नीत रूग्णालये आणि अन्य सुविधांच्या इमारती व सुशोभीकरणाच्या कामांचा समावेश आहे. याला चालना देण्यासाठी राज्य शासनाकडून प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार दिल्ली (एचएससीसी) या कंपनीची नेमणूक करण्यात आलेली आहे. या कंपनीने संबंधीत सर्व वास्तूंचे नकाशे, अंदाजपत्रके आदींनी युक्त असणारा डीपीआर तातडीने तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. हा डीपीआर सार्वजनीक बांधकाम खात्याकडे सुपुर्द करण्याचेही सांगण्यात आले आहे. महत्वाचे म्हणजे या कंपनीने जळगाव येथे तातडीने कार्यालय सुरू करण्याचेही बजावण्यात आले आहे.

मेडिकल हबच्या दुसर्‍या टप्प्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विस्तारीकरणाचे काम प्रस्तावीत करण्यात आलेले आहे. यासाठी एकूण ४५० कोटी रूपयांचे तरतूद लागणार आहे. या दोन्ही टप्प्यांच्या कामांना गती देण्याचे निर्देश वैद्यकीय शिक्षणमंत्री ना. अमित देशमुख यांनी दिले आहेत. या संदर्भात मेडिकल हबच्या प्रकल्पांना लवकरात लवकरच सुधारित प्रशासकीय मान्यता मिळून याच्या कामाला प्रारंभ होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

यासोबत जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तांत्रीक आणि अतांत्रीक सेवेतील एकूण ५८ कर्मचारी वर्ग करण्यात आले असून यातील २५ कर्मचारी काम करत आहेत. सुश्रुषा संवर्गात एकूण १४७ कर्मचारी काम करत आहेत. तर, वैद्यकीय विभागाच्या अंतर्गत ५५८ पदांपैकी फक्त २४ पदे भरण्यात आलेली आहेत. याचा विचार करता, सध्याची स्थिती लक्षात घेऊन तांत्रीक आणि अतांत्रीक या दोन्ही संवर्गातील कर्मचार्‍यांच्या २०२१ मध्ये बदल्या करण्यात येऊ नयेत अशी मागणी ना. गुलाबराव पाटील यांनी केली असून ना. देशमुख यांनी याला देखील तातडीने मान्यता दिली आहे.

या संदर्भात ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, मेडिकल हबचे काम हे गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबीत होते. याच्या दोन्ही टप्प्यांसाठीचे निर्देश वैद्यकीय शिक्षणमंत्री ना. अमित देशमुख यांनी जारी केल्याने या प्रकल्पाचे प्रत्यक्ष काम तात्काळ सुरू होणार आहे. कोरोनाने आपल्याला आरोग्याची काळजी घेण्याचे शिकवले आहे. तर राज्य शासनाच्या या निर्णयामुळे जळगाव जिल्ह्यातील आरोग्य सेवेचे बळकटीकरण होणार असल्याने ना. गुलाबराव पाटील म्हणाले.

वैद्यकीय शिक्षण व सांस्क़तीक कार्य विभागाचे मंत्री ना अमितजी देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीसाठी जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील, शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाचे प्रधान सचिव मा.सौरभ विजय , वैद्यकीय शिक्षण व संशोधनचे संचालकडॉ.दिलीप म्हैसेकर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, अधिष्ठाता डॉ.जयप्रकाश रामानंद, सार्वजनिक बांधकाम मंडळाचे अधिक्षक अभियंता रुपा गिरासे, कार्यकारी अभियंता जी. एच. राजपुत, एचएससीसी कंपनी जनरल मॅनेजर नरेंद्र उपाध्ये, एचएससीसी कंपनीचे डयेप्ुयटी जनरल मॅनेजर श्यामसुंदर मिडडा सहायक अभियंता सुभाष राऊत यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Exit mobile version