Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सुपारी किलींग : जळगावचा आरोपी शहापूर पोलिसांच्या ताब्यात

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | व्यावसायिकाची सुपारी घेऊन खून करणार्‍या जळगावातील आरोपीला शहापूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

प्रवीण विनोद शिंदे (वय २१, रा. हरिविठ्ठलनगर) या तरूणाला रामानंदनगर पोलिसांनी ३ जुलै रोजी पिस्तुलच्या धाकावर दहशत माजवत असल्याच्या आरोपातून अटक केली होती. त्याला प्रारंभी पोलीस आणि नंतर न्यायालयीन कोठडी देखील सुनावण्यात आली होती. दरम्यान, याच तरूणाने मुंबईतील एका हॉटेल व्यावसायिकाचा खून केल्याचे निष्पन्न झाल्याने त्याला मुंबई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

मुंबईतल्या साकीनाका (मुंबई) येथे संदीप सरवणकर व प्रफुल्ल पवार हे दोघे भागीदारीत हॉटेल चालवत होते. तर, प्रवीण विनोद शिंदे (वय २१, रा. हरिविठ्ठलनगर) व त्याचा मुंबईतील मित्र सागर मराठे दोघे शेजारच्याच कोकण किनारा या हॉटेलमध्ये काम करीत होते. सरवणकर व पवार यांच्यात पैशांवरून खटके उडत होते. यातूनच सरवणकर याने प्रवीणला २० हजार रुपयांची सुपारी दिली. या अनुषंगाने १ जुलै रोजी शहापूर येथील खर्डी गावाजवळ प्रवीणने पवार यांच्यावर पिस्तूलने गोळी झाडून त्यांचा खून केला. त्यानंतर प्रवीण जळगावात पळून आला. येथेच पिस्तुलच्या बळावर दहशत माजवत असल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी त्याला गजाआड केले.

तर दुसरीकडे प्रफुल्ल पवार यांच्या खून प्रकरणी ३ जुलै रोजी शहापूर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी या प्रकरणी सागर मराठेला अटक करून चौकशी केली असता त्याने आपल्या सोबत प्रवीण विनोद शिंदे (वय २१, रा. हरिविठ्ठलनगर, जळगाव ) हा देखील यात सहभागी असल्याची माहिती दिली. या अनुषंगाने शहापूर पोलिसांनी प्रवीण शिंदे याला ताब्यात घेतले आहे.

Exit mobile version