लागा तयारीला : जिल्ह्यात नगरपालिका, जि.प. आणि पं.स. निवडणुकांची रणधुमाळी !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज स्पेशल रिपोर्ट | सुप्रीम कोर्टाने आज राज्य निवडणूक आयोगाला निर्देश दिल्यानुसार आता स्थानिक स्वराज्य संस्थांचा बार उन्हाळ्यातच उडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. जळगाव जिल्ह्यातील नगरपालिका, पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदेची रणधुमाळी यातून आजपासून सुरू होणार आहे.

ओबीसी आरक्षणाचा प्रश्‍न प्रलंबीत असल्यामुळे राज्य सरकारने दोन विधेयके संमत केले. यात प्रभाग निर्मितीचे अधिकार राज्य सरकारने स्वत:कडे घेऊन सहा महिन्यांसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याची घोषणा केली होती. तथापि, या दोन्ही विधेयकांना आव्हान देणार्‍या याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आल्या होत्या. या याचिकांवर एकत्रीतपणे सुनावणी घेण्यात आली. याचा निर्णय आज सुप्रीम कोर्टात लागला. यात कोर्टाने राज्य निवडणूक आयोगाला दोन आठवड्यांच्या आत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे आता नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका या जून अखेर पर्यंत पूर्ण होतील अशी शक्यता आहे.

सुप्रीम कोर्टाचा हा निकाल जळगाव जिल्ह्यातील राजकारण्यांना अलर्ट करणारा ठरणार आहे. कारण जिल्ह्यातील १५ नगरपालिकांवर प्रशासक आहेत. यात अमळनेर, भुसावळ, भडगाव, चोपडा, चाळीसगाव, धरणगाव, एरंडोल, पारोळा, पाचोरा, यावल, फैजपूर, रावेर, वरणगाव आणि सावदा या नगरपालिकांचा समावेश आहे. तसेच नव्यानेच अस्तित्वात आलेल्या नशिराबाद नगरपालिकेवरही प्रशासकराज आहे. या सर्व नगरपालिकांच्या निवडणुका आता होणार आहेत. याच्या जोडीला सर्व १५ पंचायत समित्यांवर देखील प्रशासक असून त्यांच्याही निवडणुकीची नांदी झडल्याचे दिसून येत आहे. तर सर्वात महत्वाचे म्हणजे मिनी मंत्रालय म्हणून ख्यात असणार्‍या जिल्हा परिषदेची निवडणुक देखील आगामी कालखंडात होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर, निवडणूक आयोगाने प्रभाग, गट आणि गण यांची रचना केली असली तरी आज सुप्रीम कोर्टात दिलेल्या माहितीनुसार आधीच्या रचनेप्रमाणेच निवडणूक होण्याची शक्यता बळावली आहे. अर्थात, हा सर्व संभ्रमावस्थेचाच प्रकार असल्याचे दिसून येत आहे.

जळगाव जिल्हा परिषदेत भाजपच्या सत्तेला महाविकास आघाडी आव्हान देणार का ? हा आगामी निवडणुकीतील सर्वात मोठा मुद्दा राहणार आहे. तर नगरपालिका आणि पंचायत समित्यांमध्येही भाजप विरूध्द महाविकास आघाडीत तगडा मुकाबला होण्याची शक्यता आहे. तथापि, महाविकास आघाडीत अनेक तालुक्यांमध्ये बिघाडी झालेली आहे. यात मुक्ताईनगर मतदारसंघातील सावदा येथे शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता जवळपास दुरापास्त आहे. हाच प्रकार भुसावळ, पाचोरा, भडगाव आदी ठिकाणी देखील होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे काही ठिकाणी शिवसेना आणि भाजपमध्ये चांगल्या प्रमाणात सलोखा असल्याचे अनोखे चित्रदेखील आहे. यामुळे येथे उघड अथवा छुपी युती होण्याची शक्यता देखील आहेच.

दरम्यान, आगामी काळात येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हा जिल्ह्यातील बड्या नेत्यांच्या नेतृत्वाच्या कस घेणार्‍या ठरतील. यात प्रामुख्याने विद्यमान पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील आणि माजी मंत्री आ. गिरीश महाजन व एकनाथराव खडसे यांची ताकद या निवडणुकीत पणास लागणार आहे. यात प्रत्येक नेत्याला आपापले बालेकिल्ले राखत आपल्या पक्षाला यश मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.

Protected Content