Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

प्रवीण दरेकर यांच्या विरोधात जिल्हापेठ पोलीस स्थानकात राष्ट्रवादीची तक्रार (Video)

जळगाव प्रतिनिधी | विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा अवमान करणारे वक्तव्य केल्यामुळे त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवावा अशी मागणी राष्ट्रवादी महिला कॉंग्रेस महानगरतर्फे आज जिल्हापेठ पोलीस स्थानकातील अर्जाच्या माध्यमातून केली आहे.

राष्ट्रवादी महिला आघाडीच्या महानगराध्यक्षा मंगलाताई पाटील यांनी जिल्हापेठ पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत म्हटले आहे की, मी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पदाधिकारी असुन मी सध्या राष्ट्रवादी महानगर महिला जिल्हाध्यक्ष या पदावर कार्यरत आहे. दि. १३ सप्टेंबर २०२१(सोमवार) रोजी मौजे शिरुर (पुणे जिल्हा) येथे आद्य क्रांतीकारक उमाजी नाईक यांच्या २३० व्या जयंती निमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमांमध्ये महाराष्ट्र राज्याचे विधानपरिषद विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी त्यांच्या भाषणामध्ये जाणुनबजुन राष्ट्रवादी कॉंग्रेस हा रंगलेल्या गालाचे मुके घेणारा पक्ष आहे. असे वक्तव्य केलेले आहे. संबंधीत वक्तव्याचे व्हिडीओ रेकॉर्डींग, समाज माध्यम, टी.व्ही. चॅनेल्स, व वृत्तपत्रांमध्ये खुप मोठ्या प्रमाणात प्रसारीत झालेले आहे.

प्रविण दरेकर यांनी सदरील वर नमुद केलेल्या वक्तव्यामुळे तमाम महिला वर्गाच्या मनामध्ये लज्जा उत्पन्न होवुन, महिलांच्या विनयशिलतेचा अपमान केलेला आहे. तसेच त्यांनी सदरील वक्तव्य करुन राष्ट्रीय एकात्मतेला धोका पोहचवुन दोन गटांमध्ये तेढ निर्माण केलेली आहे. तसेच हे वक्तव्य हे राष्ट्रवादी पक्षाच्या जनमानसातील प्रतिमेला नुकसान पोहचवुन बदनामी करण्याच्या उद्देशाने समाजामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची बदनामी केलेली आहे.

यामुळे प्रविण दरेकर यांनी वर नमुद केल्याप्रमाणे दखलपात्र गुन्हा केलेला असुन प्रविण दरेकर यांच्यावर भारतीय दंडविधाना प्रमाणे १५३ बी, ५०० व ५०९ प्रमाणे गुन्हा दाखल करुन पुढील योग्य ती कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी या तक्रार अर्जात करण्यात आलेली आहे.

खालील व्हिडीओत बघा राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकार्‍यांनी केलेली मागणी !

Exit mobile version