Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यावरील हल्ल्याचा जाणून घ्या संपूर्ण घटनाक्रम

kulbhushan patil

जळगाव प्रतिनिधी | उपमहापौर कुलभूषण पाटील हे आज रात्री आपल्या घरी येत असतांना त्यांच्यावर आणि नंतर त्यांच्या घरावर गोळीबार करण्यात आल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. हा गोळीबार नेमका कसा झाला ? याची माहिती खुद्द कुलभूषण पाटील यांच्यासह हा गोळीबार पाहणारे त्यांचे साथीदार आणि त्यांच्या बंधूंनी प्रसारमाध्यमांना दिली आहे. जाणून घ्या या भयंकर प्रकाराचा घटनाक्रम !

उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार-आज दुपारी मी क्रिकेटच्या वादातून दोन गटांमध्ये झालेल्या धुम्मसबाबत मध्यस्थी केली होती. हा वाद पोलीस स्थानकात गेला असतांना त्यांनी मिटविला. यामुळे संतापलेल्या एका गटातील काही जणांनी त्यांना पोलीस स्थानकातच शिवीगाळ केली. नंतर त्यांना फोनवरून धमकावण्यात आली. आज आम्ही तुला ठार मारून टाकू अशी धमकी त्यांना देण्यात आली. दरम्यान, पावणेदहा वाजेच्या सुमारास उपमहापौर कुलभूषण पाटील हे आपले सहकारी अनिल यादव यांच्यासोबत दुचाकीवरून घरी येत असतांना त्यांच्या दिशेने गोळीबार करण्यात आले. यामुळे ते दुचाकीवरून भरधाव वेगाने आपल्या घराकडे आले असतांना इनोव्हातील हल्लेखोरांनी त्यांचा पाठलाग सुरू केला. त्यांच्या घराच्या दिशेने देखील गोळीबार करण्यात आला. तथापि, गोळीबाराचा आवाज ऐकल्यामुळे परिसरातील नागरिकांनी त्यांच्या घराकडे धाव घेतली. यामुळे हल्लेखोर पळून गेले.

उपमहापौरांचे बंधू पंकज पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार- कुलभूषण पाटील हे कार्यालयातून घराकडे येत असतांना त्यांच्यावर रस्त्यावर एक आणि नंतर घराजवळ तीन गोळ्या झाडण्यात आल्या. त्यांनी आवाज दिल्याने सर्व जण घरात गेले. सर्व हल्लेखोर हे इनोव्हा कारमधून आले होते. त्यांनी तीन गोळ्या झाडल्यानंतर पळ काढला. दरम्यान, पोलिसांना घटनास्थळावरून एक जीवंत काडतूस आढळून आले.

दरम्यान, उपमहापौरांचे सहकारी अनिल यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार- इनोव्हामधून आलेल्या हल्लेखोरांनी एकूण चार गोळ्या झाडल्या. यातील एक गोळी ही कुलभूषण पाटील हे आपल्या कार्यालयातून घराकडे येत असतांना उतारावर अंधारात झाडली. ही गोळी दुरून झाडण्यात आली होती. दरम्यान, इनोव्हाने कुलभूषण यांचा पाठलाग सुरू केला. ते घराजवळ आले असतांना त्यांच्या दिशेने दोन गोळ्या झाडण्यात आल्या. तर त्यांच्या घरात असणार्‍या मुलांच्या दिशेने सुध्दा एक फायर करण्यात आले. या प्रकारे एकूण चार गोळ्या झाडण्यात आल्या. यातील तीन गोळ्या या कुलभूषण पाटील यांच्या घराजवळ झाडण्यात आल्याची माहिती अनिल यादव यांनी दिली.

तर, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांना कुलभूषण पाटील यांच्यावर नेमक्या किती गोळ्या झाडण्यात आल्या ? याची विचारणा केली असता त्यांनी पूर्ण चौकशीअंती एफआरआर नोंदणीचे काम सुरू करण्यात आले असून यात माहिती देण्यात येईल असे डॉ. मुंढे म्हणाले.

यांनी केला गोळीबार !:

दरम्यान, उपमहापौर कुलभूषण पाटील, त्यांचे सहकारी अनिल यादव आणि बंधू पंकज पाटील यांनी हल्लेखोरांना प्रत्यक्ष पाहिले आहे. यात मंगल राजपूत, महेंद्र राजपूत, जुगल बागूल, उमेश राजपूत आणि बिर्‍हाडे (पूर्ण नाव माहित नाही !) यांनी गोळीबार केल्याची माहिती दिली आहे. याबाबतची फिर्याद रामानंदनगर पोलीस स्थानकात देण्यात आली असून रात्रीपासून या सर्वांचा शोध सुरू करण्यात आला आहे.

Exit mobile version