Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जिल्हा बँकेत नाराजीनाट्य; रवींद्रभैय्यांच्या राजीनाम्यात आगामी घडामोडींचे बिजारोपण !

जळगाव प्रतिनिधी | एकीकडे जिल्हा बँकेला ईडीने नोटीस दिली असून दुसरीकडे बँकेची निवडणूक तोंडावर आली असतांनाच राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष तथा बँकेचे ज्येष्ठ संचालक रवींद्रभैय्या पाटील यांनी संचालकपदाचा राजीनामा दिल्याने सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे. त्यांनी नाराजीतून राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे.

काल जिल्हा बँकेत खूप घडामोडी घडल्या. ईडीने संत मुक्ताई साखर कारखान्यासाठी दिलेल्या कर्जाबाबत विचारणा करणारी नोटीस बजावल्याने उडालेली खळबळ शांत होत नाही तोच रवींद्रभैय्या पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. ते बँकेचे ज्येष्ठ संचालक असून त्यांनी बँकेच्या चेअरमनपदाची धुरा देखील सांभाळलेली आहे. त्यांचे वडील भाऊसाहेब प्रल्हादराव पाटील हे देखील प्रदीर्घ काळ संचालक व नंतर चेअरमन होते. अर्थात, जिल्हा बँकेच्या इतिहासातील काही दशके पाटील घराण्यातील संचालक कार्यरत आहेत. या पार्श्‍वभूमिवर, रवींद्रभैय्या पाटील यांनी ऐन निवडणुकीआधी राजीनामा दिल्याने चर्चेला उधाण आले आहे.

जिल्हा बँकेला ईडीची नोटीस आल्याने खळबळ उडालेली असून येत्या काही दिवसात बँकेची निवडणूक प्रक्रिया सुरू होणार असल्याचेही स्पष्ट झाले आहे. असे असतांना रवींद्र पाटील यांनी त्यांच्या संस्थेला जिल्हा बँकेने दिलेल्या कर्जाबाबत वन टाईम सेटलमेंट होण्यातील अडचणींमुळे राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. एकनाथराव खडसे यांच्यामुळे ही सेटलमेंट होऊ न शकल्याचा आरोप पाटील यांनी आधी देखील केला आहे. यातच त्यांनी आता थेट राजीनाम्याचा निर्णय घेतल्याने जाणकारांच्या भुवया उंचावल्या आहेत.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत यंदा तरी सर्वपक्षीय पॅनल होण्याची शक्यता धुसर आहे. तसेच एकनाथराव खडसे हे अडचणीत असल्याने ते यात पूर्णपणे लक्ष देणार की नाही ? याबाबतही आजच कुणी ठामपणे सांगू शकत नाही. या पार्श्‍वभूमिवर, रवींद्रभैय्या पाटील यांनी राजीनामा देऊन आपली नाराजी दाखवितांनाच आगामी निवडणुकीबाबत सावध पवित्रा घेतल्याचे दिसून येत आहे. अर्थात, यातून वन टाईम सेटलमेंट होण्याची शक्यता तर आहेच, पण त्यांनी आपली नाराजी ही योग्य वेळेस व अतिशय निर्णायक पध्दतीत दाखवून दिली आहे. अद्याप पाटील यांचा राजीनामा मान्य करण्यात आलेला नाही. कदाचित तो मान्य न करता रवींद्रभैय्यांची समजूत देखील काढली जाईल. तथापि, राजीनामा देऊन त्यांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारल्याचे स्पष्ट झाले आहे.

Exit mobile version