Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जिल्हा बँक निवडणूक : सर्वपक्षीय पॅनलचा ठरला ‘फॉर्म्युला’ !

जळगाव प्रतिनिधी | जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीसाठी आज झालेल्या सर्वपक्षीय नेत्यांच्या कोअर बैठकीत जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्‍चीत झाला असून याबाबत उद्या अधिकृत घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती आज पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिली आहे.

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम निश्‍चीत झाला असून याबाबत सोमवारी अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. जिल्हा बँकेच्या संचालक मंडळासाठी २१ नोव्हेंबर रोजी मतदान होण्याची शक्यता आहे. निवडणूक कार्यक्रमाच्या संभाव्य वेळापत्रकानुसार ११ ऑक्टोबरपासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची सुरुवात होऊ शकते. जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी बँकेतील सभागृहात कार्यालय कार्यान्वित करण्यात आले आहे. वाहने आणि विश्रामगृह सहकार विभागाकडून अधिग्रहीत करण्यात आले आहे. बँकेच्या सभागृहातील कार्यालयात निवडणुकीची प्रक्रिया राबवली जाणार आहे.

दरम्यान, एकीकडे निवडणुकीसाठी प्रशासकीय तयारी पूर्ण झाली असतांना दुसरीकडे सर्वपक्षीय पॅनलसाठीच्या घडामोडी वेगवान झाल्या आहेत. यासाठी काल गुलाबराव देवकर वैद्यकीय महाविद्यालयात राष्ट्रवादीची बैठक पार पडली. यानंतर आज अजिंठा विश्रामगृहात पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत सर्वपक्षीय नेत्यांच्या कोअर समितीची बैठक पार पडली. याप्रसंगी माजी मंत्री आ. गिरीश महाजन, आ. चिमणराव पाटील, आ. राजूमामा भोळे, गुलाबराव देवकर, डॉ. सतीश पाटील, आ. शिरीष चौधरी, माजी आ. प्रा. चंद्रकांत सोनवणे, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार आदी नेत्यांची उपस्थिती होती.

बैठक सुरू असतांनाच पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी आगामी निवडणुकीसाठीचा फॉर्म्युला जाहीर केला. यानुसार राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष व भारतीय जनता पक्षाला प्रत्येकी सात जागा मिळणार असून शिवसेनेला पाच आणि कॉंग्रेसला दोन जागा देण्यावर मतैक्य झाल्याची माहिती ना. पाटील यांनी दिली. या फॉर्म्युल्याबाबत प्रत्येक पक्षाचे नेते आपल्या वरिष्ठांना माहिती देऊन याबाबत उद्या अधिकृत घोषणा करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील म्हणाले.

Exit mobile version