राष्ट्रवादीत भाऊबंदकी : अभिषेक पाटलांच्या समर्थकांचे राजीनामास्त्र ! (Video)

जळगाव प्रतिनिधी | राष्ट्रवादीचे महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांना प्रदेश कार्यकारिणीवरील पद देऊन स्थानिक पातळीवरील प्रभाव कमी करण्याच्या श्रेष्ठींच्या निर्णयाच्या विरोधात आज त्यांच्या समर्थकांनी अतिशय आक्रमक पवित्रा घेतला. या अनुषंगाने विविध फ्रंटलच्या पदाधिकार्‍यांनी राजीनामे देऊन पक्षांतर्गत विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केल्याने राष्ट्रवादीतील अंतर्गत कलह नव्याने उफाळून आल्याचे दिसून येत आहे.

अभिषेक पाटील यांनी जळगाव विधानसभा निवडणुकीत विपरीत परिस्थीती असूनही चांगली मते घेतल्याने राजकीय जाणकार चकीत झाले होते. पराभव झाल्यानंतर लागलीच त्यांनी शहरात पक्षबांधणीचे काम सुरू केले. सोबतीला ताज्या दमाचे सहकारी घेतले. विविध उपक्रम आणि आंदोलनांच्या माध्यमातून त्यांनी जळगावात राष्ट्रवादीला उर्जीतावस्था आणण्यासाठी प्रयत्न केले. अर्थात, याला पक्षश्रेष्ठींनाही पाठींबा मिळाला. मात्र मध्यंतरी एकनाथराव खडसे यांनी आपल्या समर्थकांसह पक्षात प्रवेश केल्यानंतर स्थिती बदलली. खरं तर, खडसेंच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाला स्थानिक ज्येष्ठ नेत्यांनी कडाडून विरोध केला असतांनाही अभिषेक पाटील यांनी जाहीरपणे त्यांचे समर्थन केले. यामुळे जळगावात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष मजबूत होईल अशी सर्वांना अपेक्षा होती. पाटील यांनी काही दिवसांपूर्वीच महापालिकेच्या विरोधात जोरदार आंदोलन करून याची चुणूकदेखील दाखविली होती. मात्र या सर्व घडामोडींमध्ये अभिषेक पाटील यांचे महानगराध्यक्ष काढून ते खडसे समर्थक अशोक लाडवंजारी यांना देण्यात येणार असल्याची चर्चा झाली. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत अभिषेक पाटलांनी या ज्येष्ठांनी पक्षासाठी काय केले ? असा प्रश्‍न विचारून त्यांना निरूत्तर केले होते. मात्र काल सायंकाळी त्यांची प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आल्याने त्यांनी रात्री महानगराध्यक्षपदावरून कार्यमुक्त करण्यात यावे असे पत्र प्रदेशाध्यक्षांना रवाना केले.

यानंतर आज अभिषेक पाटील यांच्या समर्थकांनी आज राष्ट्रवादीच्या जिल्हा कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन या निर्णयाचा निषेध केला. याप्रसंगी स्वप्नील नेमाडे म्हणाले की, पक्षाचे निष्ठापूर्वक काम करूनही अशा प्रकारे गळचेपी होत असल्याने आम्ही विविध फ्रंटलचे पदाधिकारी राजीनामा देत आहोत. यात उत्तर महाराष्ट्र प्रमुख कल्पना पाटील, युवक अध्यक्ष स्वप्नील नेमाडे, सामाजिक न्याय विभागाचे जितेंद्र चांगरे; पदवीधर सेलचे अध्यक्ष अनिल पाटील; पक्षाचे शहर सचिव ऍड. कुणाल पवार, विद्यार्थी अध्यक्ष अक्षय वंजारी, युवती अध्यक्ष आरोही नेवे, वक्ता सेलचे रमेश भोळे, सांस्कृतीक सेलचे गौरव लवंगडे, ओबीसी सेलचे कौशल काकर आणि शिक्षण आघाडीचे हेमंत सोनार यांनी आपापल्या पदांचा राजीनामा दिल्याची माहिती स्वप्नील नेमाडे यांनी दिली. यात संबंधीत फ्रंटलच्या अध्यक्षांसह संपूर्ण सदस्यांनी राजीनामा दिल्याची माहिती देखील त्यांनी दिली.

खालील व्हिडीओत पहा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी व्यक्त केलेल्या संतप्त भावना….

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/433064864858196

Protected Content