महिला आर्थिक विकास महामंडळात साहित्य खरेदीची चौकशी

जळगाव प्रतिनिधी | मानव विकास कार्यक्रमांतर्गत महिला आर्थिक विकास महामंडळाकडून कापडी पिशवी युनिटमध्ये खरेदी केलेल्या साहित्याची चौकशी सुरु झाली असून या प्रकरणी माहिती अधिकार कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांनी पाठपुरावा सुरू केला आहे.

महिला आर्थिक विकास महामंडळांतर्गत कापडी पिशवी युनिट अंतर्गत खरेदी केलेल्या शिलाई मशीन, स्क्रीन प्रिंटींग, कटींग मशीन, कपाट इत्यादी वस्तू साहित्य खरेदीबाबत जिल्हाधिकार्‍यांकडे दीपककुमार गुप्ता यांनी तक्रार केली होती. यात नमूद केले होते की, शिलाई मशीन ओव्हरलॉक मशीनची बीड ४ ऑगस्ट २०२० रोजी प्रसिध्द केली. दुसरी बीड १७ सप्टेंबर २०२० रोजी प्रसिध्द केली. बीड रद्द केल्याचे योग्य कारण दिसत नाही. ३० सप्टेंबर २०२० रोजी निविदा प्रसिध्द करण्यात आली. खरेदी केलेले साहित्य बाजारभावापेक्षा जास्त असल्याचाही संशय व्यक्त केला होता. प्रशासकीय मान्यतेमध्ये नमूद केल्याप्रमाणे लाभार्थी सहभाग २५ टक्के जमा करणे अपेक्षित असताना साहित्य पुरवठा करण्यापूर्वी लाभार्थी सहभाग जमा झाल्याबाबत खातरजमा झालेली नाही. या प्रकरणी अपर जिल्हाधिकारी दर्जापेक्षा कमी नसलेल्या अधिकार्‍यामार्फत सर्व मुद्यांची चौकशी करण्यात यावी. दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, अशी तक्रार दीपककुमार गुप्ता यांनी केली होती.

गुप्ता यांनी केलेल्या तक्रारीनंतर महिला आर्थिक विकास महामंडळातील साहित्य खरेदीबाबत चौकशीसाठी ६ जुलै रोजी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी शासकीय तंत्रनिकेतनच्या प्राचार्यांनी नेमणूक दिलेला तांत्रिक अधिकारी व जिल्हा नियोजन समिती कार्यालयातील लेखा अधिकारी यांची चौकशी समिती नेमण्याचे आदेश दिले होते. लाभार्थ्यांना मिळालेल्या साहित्याबाबत स्थळ पडताळणी करुन तांत्रिक, इतर अनुषंगीक, जेम पोर्टलवरील खरेदी प्रक्रिया व खर्च तपासून अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी दिलेले आहेत. त्या अनुषंगाने समितीने चौकशीला सुरुवात केली आहे. यात पहिल्या दिवशी जामनेर तालुक्यातील चिंचखेडा येथे चौकशी करण्यात आली आहे.

Protected Content