Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

गुप्तांचा दणका : ‘त्या’ अधिकार्‍यांच्या कॅबिनमधून एसी निघणार !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | माहिती अधिकार कार्यकर्ते तथा सोशल ऍक्टीव्हिस्ट दीपक कुमार गुप्ता यांनी केलेल्या तक्रारीची दखल घेत नियमबाह्य प्रकारे बसविण्यात आलेले एसी आता निघणार आहेत.

या संदर्भातील वृत्त असे की, आपल्या कॅबिनमध्ये वातानुकुलीन उपकरण अर्थात एयर कंडिशनर बसविण्यासाठी शासकीय अधिकार्‍यांसाठी राज्य सरकारने निकष आखून दिले आहेत. याच्या अंतर्गत फक्त उच्चतम वेतनश्रेणी असणार्‍या अधिकार्‍यांनाच एसी वापरता येतो. मात्र याचे सर्रास उल्लंघन करून एयर कंडिशनर वापरण्यात येत असल्याचे आपल्याला दिसून येते. जळगावातील ख्यातनाम माहिती अधिकार कार्यकर्ते तथा सोशल ऍक्टीव्हिस्ट दीपक कुमार गुप्ता यांनी माहिती अधिकारातून जिल्ह्यातील किती अधिकार्‍यांच्या कॅबिनमध्ये एसी बसविण्यात आले आहेत ? याची माहिती जमा केली. यानंतर त्यांनी प्रत्येक खात्याच्या वरिष्ठ अधिकार्‍यांकडे याची तक्रार केली आहे.

दरम्यान, गुप्ता यांच्या तक्रारीची आता दखल घेण्यात आली आहे. याचा प्रारंभ जिल्हा रूग्णालयातून होणार असल्याचे पत्र त्यांना प्राप्त झाले आहे. या पत्रानुसार, जिल्हा रूग्णालयात पाच एसी उपकरणे लावण्यात आलेली होती. यापैकी औषधीसाठी आवश्यक असणार्‍या एसीचा अपवाद वगळता अन्य उपकरणे काढून टाकण्यात आली असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किरण पाटील यांनी दिली आहे. यामुळे दीपक कुमार गुप्ता यांच्या तक्रारीनंतर यंदाचा उन्हाळा हा अधिकार्‍यांना घाम फोडणारा ठरणार हे नक्की !

Exit mobile version