Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जळगावातील कामांना गती नसल्याने पालकमंत्र्यांनी घेतली झाडाझडती

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | महापालिकेला पुरेसा निधी देऊनही कामांना गती नसल्याने पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी बैठकीत अधिकारी आणि पदाधिकार्‍यांना खडे बोल सुनावले.

पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी जळगाव महानगराच्या विकासकामांबाबत बुधवारी बैठक घेतली. यात जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून पालकमंत्री पाटील यांनी गेल्या वर्षी ६१ कोटींचा निधी मंजूर केला होता. या निधीतून १६७ कामे मंजूर होती. परंतु, वेळेत निविदा प्रक्रीया न केल्याने बर्‍याच कामांना सुरूवात झालेली नाही. काही अपूर्ण आहेत. मार्च अखेर निधी खर्च करणे अपेक्षित असूनही याचे नियोजन न झाल्यामुळे पालकमंत्र्यांनी याप्रसंगी नाराजी व्यक्त केली.

या बैठकीत शहरातील १६७ कामांपैकी १०५ कामे सुरू, तर १२ कामे अजुन सुरू होऊ शकलेली नाहीत, असे समोर आले. गेल्या वर्षापर्यंत निधी नसल्याने कामे करता येत नव्हती. परंतु डीपीडीसीतून ६१ कोटींचा निधी दिल्यानंतरही वर्षभरात कामांचे नियोजन करू न शकल्याने ना. गुलाबराव पाटील यांनी पालिकेच्या कार्यपध्दतीवर नाराजी व्यक्त केली. कॉलनी परिसरात कामे होत आहेत परंतु मुख्य भागात कामे सुरू का केली नाहीत? असा सवाल केला. महामार्गावरील पथदिव्यांसाठी साडेतीन कोटींचा निधी मंजुर केला. परंतु, चार महिने निविदेचा घोळ सुरू ठेवला. त्यावरूनही पालकमंत्री संतापले. शहरातील कामांना गती देण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिलेत.
यावेळी महापालिका आयुक्त सतीश कुलकर्णी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, उपमहापौर कुलभूषण पाटील, नगरसेवक नितीन लढ्ढा, ललित कोल्हे आदी मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version