एक्सप्रेस-जेसीबी अपघात : दोघांवर गुन्हा दाखल

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | कामाख्या एक्सप्रेसला जेसीबीचा धक्का लागल्याप्रकरणी दोघांवर येथील रेल्वे सुरक्षा बलाच्या पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिनांक ४ जून रोजी पाचोरा तालुक्यातील परधाडे स्थानकाच्या जवळ तिसर्‍या लाईनचे काम करणारे जेसीबी हे कामाख्या एक्सप्रेसला लागले होते. यामध्ये सुदैवाने मोठी हानी टळली असली तरी प्रवाशी धास्तावले होते. यात इंजिनासह डब्याचेही काही प्रमाणात नुकसान झाले असून यामुळे एक्सप्रेसला विलंब झाला होता. या प्रकरणाची रेल्वे प्रशासनाने गंभीर दखल घेतली. सिनियर सेक्शन इंजिनिअर बृजेश कुमार, व्ही.ई.सूर्यवंशी, एस.पी.जोशी, एन.एस.राजपूत, योगेश थोरात, डी.एच.पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन सादर केलेल्या अहवालानुसार ग्रेडर चालक व सुपरवायझरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर चौकशी अहवालानुसार ग्रेडर मशीन घेताना चालकाने हलगर्जीने मशीन चालवले. त्यात नियंत्रण सुटल्याने ग्रेडर मशीन अप मेन लाइनवरून जाणार्‍या १२५२० कामाख्या-एलटीटी एक्स्प्रेसच्या इंजिनला (इंजिन क्रमांक ३७४६०, डब्ल्यू एपी-७) स्पर्शून गेले. ग्रेडर मशीनच्या ठोकरेने इंजिनाचे कॅटल गार्ड, सैडर्स असेंब्ली, फूट स्टेप्स, ब्रेक सिलेंड, ऑपरेटिंग हॅन्डल तसेच ब्रेक इंडिकेटरचे नुकसान झाले. ग्रेडर मशीनचे एक्सल तुटून मागील चाक वेगळे झाले. यात सुमारे ६९ हजार रूपयांचे नुकसान झाल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

या अनुषंगाने सदर अपघाताला कारणीभूत जेसीबी चालक मिशिर उराव सोपान उराव (वय २८, रा. तोरार पखान, टोली, जि.लोहरदगा, झारखंड) आणि सुपरवायझर अरविंद विक्रम इंगळे (वय २८, रा.कालखेडा, ता.जामनेर) या दोघांच्या विरूध्द जळगाव आरपीएफ ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content