तरुणीशी गैरवर्तन, महावितरणच्या व्यवस्थापकासह लिपीकावर गुन्हा

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | महावितरणच्या कार्यालया कंत्राटावर काम करणार्‍या तरूणीशी गैरवर्तन करणार्‍या व्यवस्थापक व लिपीकाच्या विरूध्द अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, हे प्रकरण दाबण्यासाठी भरपूर प्रयत्न झाल्यानंतर देखील हा गुन्हा दाखल झाल्याने महावितरणमधील शोषणाला वाचा फुटली आहे.

महावितरण कार्यालयात कंत्राटी पद्धतीने काम करणार्‍या कर्मचारी तरुणीशी व्यवस्थापक उद्धव कडवे व लिपीक राजेंद्र आमोदकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात पीडित तरूणीने फिर्याद दिली आहे. यात म्हटले आहे की, ती महावितरणच्या कार्यालयात कंत्राटी पध्दतीवर कार्यरत असतांना सन २०१७ ते २०२१ या काळात कडवे हे नेहमीच त्रास देत होते. सर्व कर्मचारी घरी गेल्यानंतरही उशिरापर्यंत कार्यालयात थांबवून ठेवत होते. ते व्हॉट्सऍपवर चॅटिंग करण्याची मागणी करत होते. तसेच घरी सोडून देतो, घेण्यासाठी येतो असे सांगून जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. त्यांचे म्हणने ऐकून न घेतल्याने तीन वेळा कामावरून कमी केले. नंतर पुन्हा कामावर घेऊन त्रास देणे सुरूच ठेवले. २०२१मध्ये पीडित तरुणीने काम सोडले.

यानंतर ११ मे रोजी आमोदकर याने तरुणीला फोन करून जावक रजिस्टरमध्ये नोंदी घ्यायचे काम शिल्लक असल्याने तुला कडवे साहेबांनी बोलावल्याचा निरोप दिला. त्यानुसार तरुणी १२ मे रोजी कार्यालयात गेली. या वेळी कडवे यांनी मागे झालेल्या प्रकाराची माफी मागितली, टेक्निकल साइटचे लोक माझ्या विरुद्ध कट रचत आहेत, तू त्यांना सपोर्ट करते आहेस असे मला कळले आहे अशी विचारणा केली. तरुणीने त्यावर नकारात्मक उत्तर दिले. तुला पुन्हा कामावर घेण्यासाठी प्रयत्न करतो असे कडवेंनी सांगितले. काम संपल्यानंतर आमोदकर दुचाकीने घरी सोडून देईल, असे सांगितले; परंतु तरुणीने नकार दिला. या घडलेल्या प्रकाराची तक्रार तरुणीने महावितरणच्या विशाखा समितीकडे केली आहे; परंतु, समितीने त्यावर काहीच कार्यवाही केलेली नाही. त्यामुळे तरुणीने पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

यानंतर लिपीक आमोदकर याने कार्यालयाच्या परिसरात तरुणीला भेटून कडवे साहेब चांगले आहेत, तुझे काम करून देतील असे सांगतांनाच तरुणीचा विनयभंग केला. याप्रकरणी तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस उपनिरीक्षक नीलेश गोसावी तपास करीत आहेत. महावितरणमधील या प्रकरणी अनेक संघटना आक्रमक झाल्यानंतर अखेर हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. यात पुढे काय होणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Protected Content