Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

वाळूवाल्यांच्या पार्टीत महसूल कर्मचार्‍यांचे ढिश्युम-ढिश्युम !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील कडगाव येथे वाळू व्यावसायिकांनी दिलेल्या पार्टीत महसूल कर्मचार्‍यांमध्ये आपसातच हाणामारी झाल्याचा प्रकार उघड झाल्याने खळबळ उडाली आहे.

या संदर्भातील माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील कडगाव शिवारात असलेल्या फार्म हाऊसमध्ये महसूल खात्याच्या काही कर्मचार्‍यांना वाळू वाहतुकदारांनी ओली पार्टी दिली. यामध्ये तालुक्यातील पाच ते सहा तलाठी, नायब तहसीलदार देखील सहभागी झाले होते. या दरम्यान, त्यांच्यामध्ये वाद उफाळून आला. त्याचे पर्यावसन हाणामारीत झाले. या हाणामारीत एका तलाठ्याच्या डोक्यात बाटली फोडण्यात आली. त्यांना पाच ते सहा टाके पडले असल्याची माहिती समोर आली.

मात्र महसूलच्या अधिकार्‍यांनी याचा इन्कार केला आहे. काही तलाठ्यांसह नायब तहसीलदार कडगाव येथील फार्म हाऊसवर जेवण्यासाठी गेलेले होते. तेथे वारुळे नामक व्यक्ती चुकून आला. तसेच गावातील कुणाल नावाचाही व्यक्ती आला. त्या दोघांमध्ये हाणामारी झाली. या हाणामारीत तलाठी मनोज सोनवणे यांना चुकून लागले आहे. त्यांना हाणामारीत खुर्ची लागली असून थोडेसे खरचटले असल्याचे महसूल अधिकार्‍यांनी सांगितले. या प्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आलेली नाही.

दरम्यान, या संदर्भात जळगावचे नायब तहसीलदार विशाल सोनवणे यांनी आपला याच्याशी काही संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यांच्या महणण्यानुसार फार्म हाऊसमध्ये बाहेरच्या दोघांची हाणामारी झाली. त्याच्याशी आमचा काही संबंध नाही. किरकोळ विषय असल्याने पोलिसात तक्रार दिलेली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Exit mobile version