Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जिल्हा दूध संघाची निवडणूक लांबणीवर : इच्छुकांचा हिरमोड

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | सहकार खात्याने सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्यामुळे जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीची तयारी करणार्‍या मातब्बरांचा उत्साह थंडावला आहे.

राज्य निवडणूक आयोगाने दोन दिवसांपूर्वीच राज्यातील ९२ नगरपरिषदा आणि चार नगरपंचायतींच्या निवडणुकांना स्थगिती देण्याचा निर्णय जाहीर केला. या पाठोपाठ आज राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका ३० सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय सहकार विभागाने घेतला आहे. या निर्णयामुळे सुमारे आठ हजार सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

दरम्यान, सहकार खात्याच्या या निर्णयामुळे जिल्हा सहकारी दूध संघ मर्यादीत म्हणजेच जिल्हा दूध संघाची निवडणूक पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील अनेक मान्यवर नेत्यांनी आपापल्या तालुक्यातून दूध संस्थांचे ठराव करून घेतले होते. लवकरच दूध संघाच्या निवडणुकीचे पडघम वाजणार असल्याचे दिसून आले होते. तथापि, सहकार खात्याच्या निर्णयामुळे आता निवडणूक पुढे जाणार असल्याने इच्छुकांचा विरस झाला असून त्यांची तयारी आपोआपच थंडावणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Exit mobile version