नाथाभाऊंचा विजय : जिल्ह्यातील राजकारणावर होणार ‘हे’ पाच परिणाम !

जळगाव, जितेंद्र कोतवाल ( लाईव्ह ट्रेंडस न्यूज स्पेशल रिपोर्ट ) | विधानपरिषदेत एकनाथराव खडसे यांचा झालेला विजय हा त्यांच्या वैयक्तीक राजकीय कारकिर्दीला जसा कलाटणी देणारा आहे. अगदी तसाच तो जिल्ह्याच्या राजकारणावरही परिणाम करणारा ठरणार आहे. जाणून घ्या जिल्ह्याच्या राजकारणावर याचा नेमका काय परिणाम होणार आहेत ते ?

माजी मंत्री एकनाथराव खडसे यांची विधानपरिषदेत एंट्री झाली असून याचे राज्य पातळीवर अनेकविध परिणाम होणार आहे. भारतीय जनता पक्षाचे आक्रमण उलटून लावण्यासाठी राष्ट्रवादी पक्ष त्यांच्या आक्रमकतेचा उपयोग करणार आहे. तर याच प्रमाणे जळगाव जिल्ह्यातही याचा परिणाम होणार आहे. क्रमाक्रमाने आपण हे सर्व जाणून घेऊया.

१ राष्ट्रवादीला नवसंजीवनी : २००९ साली राष्ट्रवादी कॉंग्रेसने विधानसभा निवडणुकीत चांगले यश संपादन केले होते. तेव्हा या पक्षाचे राजीव देशमुख, दिलीप वाघ, गुलाबराव देवकर, संजय सावकारे, जगदीश वळवी असे पाच आमदार निवडून आले होते. तर अपक्ष साहेबराव पाटील हे देखील नंतर राष्ट्रवादीचे सहयोगी आमदार बनले होते. यानंतर आज पक्षाचा फक्त एक आमदार आहे. एकनाथराव खडसे यांच्या आगमनामुळे जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला नवसंजीवनी मिळेल. आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षाचा स्कोअर हा नक्कीच वाढलेला दिसेल अशी शक्यता आहे. तर रावेर लोकसभा मतदारसंघातूनही राष्ट्रवादीच्या उमेदवाराची सरशी होऊ शकते. अशा प्रकारे साधारणपणे एक खासदार आणि किमान तीन-चार आमदार अशी पक्ष झेप घेऊ शकतो. सहकार क्षेत्रात आधीच जिल्हा बँकेत राष्ट्रवादी सत्तेत आहे. तर यासोबत आगामी काळातील दूध संघासारख्या सहकारी संस्थेतील राष्ट्रवादीचा दावा प्रबळ होणार आहे.

२ स्थानिक स्वराज्य संस्थांवर वरचष्मा : राज्याप्रमाणेच जिल्ह्यातील नगरपालिका, झेडपी आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका रखडल्या आहेत. या निवडणुकीत राष्ट्रवादीला यश मिळवून देण्यासाठी एकनाथराव खडसे यांच्या नेतृत्वाचा राष्ट्रवादीला लाभ होणार आहे. यामुळे काही नगरपालिका या राष्ट्रवादीच्या ताब्यात येणार असून स्वतंत्र वा शिवसेनेला सोबत घेऊन झेडपी ताब्यात घेण्याची रणनिती यशस्वी होऊ शकते.

३ जिल्ह्यातील तिसरे बलवान सत्तास्थान : जळगाव जिल्ह्यात सध्या पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील आणि माजी मंत्री आ. गिरीश महाजन हे सत्तेचे दोन धु्रव आहेत. एकनाथराव खडसे यांच्या आमदारकीमुळे आता याला तिसरा आयाम प्राप्त होणार आहे. जळगाव जिल्ह्यातील तिसरे सत्तास्थळ हे एकनाथराव खडसे यांच्या रूपाने समोर येणार असल्याची बाब आता निश्‍चीत झाली आहे.

४ हिशेब चुकता करण्याची नवी श्रुंखला ! : एकनाथराव खडसे हे आपल्या राजकीय विरोधकांना धुळ चारण्यासाठी ख्यात आहेत. त्यांच्या सर्व विरोधकांनी एकत्र येऊन त्यांची कन्या रोहिणी खडसे यांना पराभूत केले. याचा हिशोब चुकता करण्यासाठी ते योग्य वेळेची नक्कीच वाट पाहत असल्याचे आधीच दिसून आले होते. आता विधानपरिषदेत एंट्री मिळाल्याने हा प्रतिशोध नवीन पातळीवर जाण्याची शक्यता आहे.

५ दोन आघाड्यांवर लढाई : एकनाथराव खडसे यांचे आगामी काळातील पहिले टार्गेट हे भारतीय जनता पक्षाचे नेते राहतील हे सांगण्यासाठी ज्योतीष्याची आवश्यकता नाही. तर, यासोबत महाविकास आघाडीतील घटक पक्षांसोबत जुळवून घेण्यासाठी त्यांना थोडी लवचीकता दाखवावी लागेल. विशेष करून मुक्ताईनगरात त्यांचे प्रतिस्पर्धी हे शिवसैनिक असल्याने या पक्षासोबत त्यांची वागणूक ही ताठर राहण्याची शक्यता आहे. अर्थात, एकाच वेळीस भाजप आणि मतदारसंघातील शिवसेना या दोन आघाड्यांवर त्यांना लढावे लागणार आहे. याचे दृश्य आणि अदृश्य परिणाम आगामी काळात जिल्ह्यात दिसून येतील ही बाब उघड आहे. यातच खडसेंना मंत्रीपद मिळाल्यास हे परिणाम अजून मोठ्या प्रमाणात दिसतील हे देखील तितकेच खरे. . .!

Protected Content