Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

ईडीची ‘ती’ नोटीस मुक्ताई साखर कारखान्याला दिलेल्या कर्जाच्या चौकशीसाठी !

जळगाव प्रतिनिधी | सक्तवसुली संचलनालय म्हणजेच ईडीने जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला बजावलेली नोटीस ही मुक्ताई साखर कारखान्याला दिलेल्या कर्जाच्या चौकशीसाठी असल्याची माहिती बँकेतर्फे अधिकृतरित्या देण्यात आली आहे. योगायोग असा की, जेडीसीसीच्या अध्यक्षा असलेल्या रोहिणी खडसे याच मुक्ताई साखर कारखान्याच्या चेअरमन आहेत !

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला आज सक्तवसुली संचलनालय म्हणजेच ईडीने चौकशीसाठी नोटीस बजावल्याने खळबळ उडाली आहे. या संदर्भात लाईव्ह ट्रेंडस न्यूजने त्या संस्थेशी संबंधीत पदाधिकार्‍यांना बोलते केले असता कुणाला याबाबत माहिती नसल्याचे दिसून आले. तसेच या नोटीसमध्ये नेमकी कोणत्या प्रकरणाबाबत चौकशी होणार आहे याबाबतही अद्याप पूर्ण माहिती समोर आलेली नव्हती.

दरम्यान, या संदर्भात जिल्हा बँकेच्या एका जबाबदार अधिकार्‍याने लाईव्ह ट्रेंडस न्यूजशी संपर्क साधून याबाबतची अधिकृत माहिती दिली. ते म्हणाले की, मुक्ताई साखर कारखान्याला जळगाव जिल्हा बँकेने नेमके किती कर्ज दिले आहे ? याची विचारणा करण्यासाठी ईडीने नोटीस बजावली आहे. याशिवाय, अन्य दुसरा कोणताही प्रश्‍न नाही. आणि ईडीच्या या चौकशीला बँकेचे प्रशासन हे सर्वतोपरी मदत करण्यासाठी तयार आहे.

वादग्रस्त भूखंड खरेदी केल्या प्रकरणी माजी मंत्री एकनाथराव खडसे हे गोत्यात आले आहेत. या प्रकरणी त्यांची ईडी चौकशी झाली असून त्यांचे जावई गिरीश चौधरी हे ५ जुलैपासून ईडीच्या अटकेत आहेत. यानंतर खडसे आणि त्यांच्या सौभाग्यवती यांची देखील चौकशी अजून बाकी आहे. हे सारे होत असतांना आता त्यांचीच कन्या अध्यक्षा असणार्‍या जेडीसीसी बँकेला त्याच अध्यक्षा असणार्‍या मुक्ताई साखर कारखान्याच्या कर्जबाबत आलेली नोटीस ही महत्वाची मानली जात आहे. हा योगायोग असला तरी यामागे एक सूत्रबध्दता दिसून येत आहे.

Exit mobile version