Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

वॉटरग्रेसवर श्‍वेतपत्रीका काढा : गुप्तांचे खुले आव्हान

जळगाव प्रतिनिधी | वादग्रस्त व शहरवासियांवर बोजा ठरलेल्या वॉटरग्रेसच्या ठेक्याबाबत श्‍वेतपत्रीका काढावी असे खुले आव्हान माहिती अधिकार कार्यकर्ते दीपक कुमार गुप्ता यांनी केले असून याबाबतचे ट्विट त्यांनी केले आहे.

जळगाव शहरातील रस्त्यांची सध्या अतिशय दयनीय अवस्था झाली असून यामुळे अत्यंत संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. यामुळे सोशल मीडियात महापालिका प्रशासनावर टीका केली जात आहे. यातच शौचालय स्थलांतरीत करण्याच्या मागणीवरूनही दावे-प्रतिदावे करण्यात येत आहेत. दरम्यान, या प्रकरणी ‘जळगाव महापालिका-वुई-टू’ या व्हाटसऍप ग्रुपमध्ये आज सकाळपासून वाद-विवाद झडत आहेत. यात दीपक कुमार गुप्ता यांनी शहरातील विविध भ्रष्टारांच्या प्रकरणावर भाष्य केले. याप्रसंगी त्यांनी वॉटरग्रेस प्रकरणात सर्वपक्षीय नगरसेवकांची चुप्पी ही अतिशय संशयास्पद असल्याचा आरोप केला आहे. महापालिकेतील सत्ता ही शिवसेनेच्या ताब्यात असून त्यांच्याच कडे विरोधी पक्षनेते पद देखील आहे. यामुळे त्यांनी हिंमत दाखवून वॉटरग्रेसवर श्‍वेतपत्रीका काढावी अशी मागणी गुप्ता यांनी केली.

यानंतर दीपक कुमार गुप्ता यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार संजय राऊत, पालकमंत्री गुलाबराव पाटील, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि शिवसेना कम्युनिकेशन यांना टॅग करून जळगाव महापालिकेत वॉटरग्रेसच्या ठेक्यावर श्‍वेतपत्रीका काढण्याची हिंमत दाखविण्याची मागणी केली आहे. दरम्यान, गुप्ता यांच्या आव्हानावर स्थानिक नेत्यांनी काहीही प्रतिक्रिया दिली नसतांना आता वरिष्ठांकडे दाद मागितल्यानंतर तरी यावर काही कार्यवाही होणार का ? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Exit mobile version