Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जिल्हाधिकार्‍यांनी ग्रामसेविकेला सुनाविली न्यायालयीन कोठडी

जळगाव प्रतिनिधी | भुसावळ तालुक्यातील किन्ही येथील ग्रामपंचायतीचे दप्तर ताब्यात न देणार्‍या ग्रामसेविका प्रियंका अशोक बाविस्कर यांना जिल्हाधिकार्‍यांनी एक महिने न्यायालयीन कोठडीत टाकण्याचे आदेश दिल्याने खळबळ उडाली आहे. जिल्हा परिषद सदस्य पल्लवी प्रमोद सावकारे यांच्या तक्रारीवरून ही कठोर कारवाई करण्यात आली आहे.

याबाबत वृत्त असे की, भुसावळ तालुक्यातील किन्ही येथून बदली होऊनही आपल्या ताब्यातील दप्तर नियुक्त ग्रामसेवकास हस्तांतरित न करणार्‍या किन्ही येथील तत्कालीन ग्रामसेविका प्रियंका अशोक बाविस्कर यांच्यावर जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी कठोर कारवाई केली आहे.

तत्कालीन ग्रामसेविका बाविस्कर यांनी चुंचाळेला(ता. यावल) बदली होऊनही त्यांच्या कार्यकाळातील ग्रामनिधी, पाणीपुरवठा स्वच्छ भारत मिशन, रोजगार हमी, १४वा वित्त आयोग, दलित वस्ती योजनेची कीर्द, कोणतेही दप्तर देण्याचे बाविस्कर यांनी टाळले होते. याबाबत जिल्हा परिषद सदस्या पल्लवी प्रमोद सावकारे यांनी पाठपुरावा केला होता. यावर जिल्हाधिकारी यांच्याकडे दोन महिन्यापूर्वी सुनावणी झाली होती. यात १० दिवसांच्या आत दप्तर ताब्यात देण्याचा लेखी आदेश जिल्हाधिकारी राऊत यांनी ४ नोव्हेंबरला दिले होता.तरी दप्तर न दिल्याने ग्रामसेवकांच्या तक्रारीवरून कारवाई करण्यात आली.

प्रियंका बाविस्कर यांना वारंवार सूचना देऊनही दप्तर न दिल्याने या ग्रामसेविकेला दप्तर परत देईपर्यंत किमान ३० दिवस न्यायालयीन कोठडीत टाकण्याचे निर्देश दिले आहे. यासंबंधीचे पत्र यावल पोलिस निरीक्षकासह जिल्हा तुरुंग अधीक्षकांना दिले आहे.

Exit mobile version