Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

बिग न्यूज : वाळू तस्करांविरूध्द धडक कारवाई; ट्रॅक्टर्स व डंपर्स जप्त

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शहरापासून जवळच असलेल्या गिरणा नदीपात्रात भल्या पहाटेपासून महसूल व पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत वाळू तस्करांना जोरदार दणका देण्यात आला असून यात पोलिसांनी अनेक अधिकृत वाळू वाहून नेणारे ट्रॅक्टर्स व डंपर्स जप्त केले आहेत.

सध्या वाळू तस्करी मोठ्या प्रमाणात होत असून याच्या पुढे प्रशासन अक्षरश: हतबल झाल्याचे दिसून येत आहे. आधीच्या जिल्हाधिकार्‍यांच्या कार्यकाळात तर वाळू तस्कर मोकाट सुटले होते. त्यांच्या बदलीनंतर जिल्ह्याची सूत्रे हाती घेतलेले जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी वाळू तस्करीला आळा घालणे ही आपली प्राथमिकता असेल असे सांगितले होते. यानुसार मध्यंतरी काही प्रमाणात कारवाई करण्यात आली होती. मात्र रात्रीपासून वाळू तस्करांच्या विरोधात मोठी मोहिम राबविण्यात आली आहे.

आज पहाटे दोन वाजेपासून नाशिक येथील महसूल खात्याचे पथक हे स्थानिक महसूल व पोलीस प्रशासनासह थेट गिरणा नदीच्या पात्रात उतरले. यासोबत हे पथक गिरणा पात्राला लागूनच असलेल्या बांभुरी गावात देखील दाखल झाले. या पथकाने नदीपात्रासह गावात उभे असलेले ट्रॅक्टर्स आणि डंपर्स जप्त केले. येथून जवळपास १०० पेक्षा जास्त वाहने जप्त करून नेल्याने एकच खळबळ उडाली आहे. तर, सकाळपासून देखील बांभोरी गावासह परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. या संदर्भात अद्याप प्रशासनातर्फे अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

Exit mobile version