Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जलजीवन मिशनमध्ये जळगाव जिल्हा राज्यात पहिला !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव जिल्हा हा जलजीवन मिशनमध्ये राज्यात पहिला तर देशात ६१ वा आलेला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने देशभरात जलजीवन मिशन ही योजना अंमलात आली आहे. याच्या अंतर्गत २०२४ पर्यंत देशातील प्रत्येक घरापर्यंत नवीन निकषानुसार पिण्याचे शुध्द पाणी पोहचवण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्यात ही योजना पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्रीपदाची धुरा असणारे ना. गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे राबविण्यात आली आहे. या योजनेतून अगदी वाडी-वस्त्या आणि दुर्गम भागापर्यंत शुध्द पेयजल पोहचवण्याचा संकल्प करण्यात आलेला आहे.

या प्रयत्नांना आता फळ लाभल्याचे दिसून येत आहे. जलजीवन सर्वेक्षण-२०२३ अंतर्गत जलजीवन मिशनच्या अंतर्गत चमकदार कामगिरी करणार्‍या जिल्ह्यांची रँकींग जाहीर करण्यात आली आहे. यात जळगाव जिल्हा हा राज्यातून पहिला तर देशातून ६१व्या क्रमांकावर आलेला आहे. लक्षणीय बाब म्हणजे या यादीत १९९ जिल्ह्यांना नामांकीत करण्यात आले असून यात जळगावला हे स्थान मिळाले आहे.

जलजीवन मिशनमध्ये जळगाव जिल्ह्यात अग्रस्थाने देण्यासाठी पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे सीईओ श्री अंकीत, पाणी पुरवठा खात्याचे अभियंते व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले आहेत.

Exit mobile version