स्वस्त मूल्यात वस्तू देण्याच्या आमिषातून १४ लाखांचा गंडा

जळगाव, प्रतिनिधी | टिव्ही, फ्रीज आदींसारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तू होलसेल दरात देण्याच्या नावाखाली शहरातील तरूणाची तब्बल १४ लाख रूपयाच फसवणूक करण्यात आली असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शेख मोहंमद वासीम मोहंमद हारून ( वय ३९, रा. इकबॉल कॉलनी, जळगाव) याचे मेहरूणमध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तू दुरूस्तीचे दुकान आहे. गेल्या वर्षी त्याने फेसबुकवर एसी टेक्नीशीयन हा ग्रुप जॉईन केला होता. या ग्रुपचा ऍडमीन सैयद वासीम अब्दुल याच्याशी त्याने संपर्क साधला. यातून झालेल्या ओळखीतून सैयद वासीम अब्दुल याने आपल्याकडे अत्यंत स्वस्त किंमतीत इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तू मिळत असल्याचे सांगितले. त्याने आपल्या वस्तूंचा कॅटलॉग देखील पाठविला.

सैयद वसीम अब्दुल शेख मोहंमद वासीम मोहंमद हारून याने १०० एसी, १०० टिव्ही आणि १०० फ्रिज यांची ऑर्डर दिली. यासाठी त्याने तब्बल १४ लाख ३९ हजार ४५८ रूपये समोरच्या व्यक्तीच्या अकाऊंटमध्ये जमा केले. मात्र बरेच दिवस होऊन देखील त्याला वस्तू मिळाल्या नाहीत. यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्याचे सायबर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास निरिक्षक लिलाधर कानडे हे करीत आहेत.

Protected Content