बंड एकनाथ शिंदेंचे, टेन्शन सतरा मजलीतल्या सत्ताधार्‍यांना !

जळगाव, लाईव्ह ट्रेंडस न्यूज स्पेशल रिपोर्ट | नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडाचा पवित्रा घेतल्याने जसे राज्य सरकारवर संकटाचे सावट दिसून येत आहे. अगदी त्याच प्रकारे जळगाव महापालिकेवरही याचा परिणाम होणार आहे. विशेष करून शिंदे यांचा गट महापालिकेत प्रभावी असल्याने हा गट त्यांच्या सोबत जाण्याची शक्यता बळावली आहे.

गेल्या वर्षी २२ एप्रिल २०२१ रोजी भाजपमध्ये उभी फूट पाडून शिवसेनेने सत्ता संपादन केली होती. यात कुलभूषण पाटील यांच्या नेतृत्वाखालील नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने हे सत्तांतर घडले होते. स्वत: कुलभूषण पाटील हे एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक असल्यामुळे त्यांच्या आशीर्वादानेच शिवसेनेला सत्ता मिळाली असल्याची बाब स्पष्ट आहे. मध्यंतरी अनेक प्रसंगांमध्ये एकनाथ शिंदे हेच महापालिकेतील सत्ताधार्‍यांशी थेट संपर्कात असल्याचे स्पष्ट झाले होते. आता शिंदे यांनीच बंडखोरीचा पवित्रा घेतल्याने महापालिकेतील सत्तेलाही सुरूंग लागण्याची शक्यता आहे. अन्यथा विद्यमान सत्ताधारी देखील शिंदे यांच्यासोबत जाऊन खुर्ची वाचवतील असे चित्र आहे.

एकनाथ शिंदे हे भाजपच्या सोबत जाऊन सत्तेत सहभागी होण्याची शक्यता आहे. असे झाल्यास महापालिकेतील सत्ताधारी हे जर त्यांच्या सोबत गेलेत तर पुन्हा एकदा भाजप अथवा शिंदे यांच्या गटाकडे महापालिकेची सूत्रे जाऊ शकतात. म्हणजेच शिंदेंच्या बंडखोरीचे सतरा मजलीतल्या सत्ताधार्‍यांना नक्कीच टेन्शन आल्याचे दिसून येत आहे.

Protected Content