Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

महापालिकेची बेकायदेशीर वसुली परत करण्यास टाळाटाळ-लुंकड

जळगाव प्रतिनिधी । न्यायालयाने जळगाव महापालिकेत गैरप्रकारे केलेली वसुली परत देण्याचे आदेश देऊनही याबाबत टाळाटाळ होत असल्याचा आरोप राजकमल टॉकीजचे संचालक महेंद्र लुंकड यांनी केला आहे. याबाबत आपण अवमान याचिका दाखल केल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे.

याबाबत महेंद्र लुंकड यांनी दिलेली माहिती अशी की, जळगाव महापालिकेने २०१८ मध्ये जबरदस्तीने दबाव आणून करापोटी ३४ लाख २० हजार २५९ रुपये डिसेंबर २०१८ रोजी चेक व आरटीजीएसने वसूल केले. त्याच्या विरुद्ध औरंगाबाद हायकोर्टात अ‍ॅड. सत्यजित बोरा यांच्या मार्फत याचिका दाखल केली होती. त्यावर ३० नोव्हेंबर २०१८, १८ जानेवारी २०१९, २४ एप्रिल २०१९ व २९ मे २०१९ ला सुनावणी होऊन मनपा आयुक्त यांनी वसूल केलेली संपूर्ण रक्कम ५.२.२०१९ पूर्वी परत करावी व त्यावर ६ टक्के व्याज रक्कम भरल्या तारखेपासून आयुक्तांच्या पगारातून वसूल करावे, असे आदेशात निर्देश देण्यात आले आहेत.

दरम्यान, राजकमल टॉकिज प्रशासनाकडून जळगाव महापालिकेने करापोटी बेकायदेशीरपणे वसूल केलेले ३४ लाख रुपये व्याजासह परत देण्याचे आदेश दिलेले दिले असले तरी यावर कार्यवाही होत नाही. याबाबत आपण आयुक्त, उपायुक्त यांच्या भेटी घेऊनही टाळाटाळ केली जात आहे. वय ७८ वर्षे असताना या प्रकरणाने मानसिक व आर्थिक नुकसानीबद्दल मोठा मानसिक धक्का बसला आहे. माझ्या प्रकृतीस काही कमी जास्त झाल्यास त्याला महापालिका आयुक्त जबाबदार असतील, असा इशारा लुंकड यांनी दिला आहे.

Exit mobile version