Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

लसीकरणाला पुन्हा एकदा ब्रेक; जळगावसह तालुक्यांमध्ये साठा संपला

जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यास लसींचा अपुरा पुरवठा होत असल्याने आता साठा जवळपास संपुष्टात आला असून यामुळे दिनांक २६ मे रोजी लसीकरणाला पुन्हा एकदा ब्रेक लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

जळगाव जिल्ह्यात लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात अतिशय वेगाने लसीकरण करण्यात आले. मात्र लसींचा साठा कमी-जास्त होऊ लागल्याने मध्यंतरी चांगलाच गोंधळ उडाला होता. लोकांना नेमकी लस केव्हा येणार आणि केव्हा नाही ? याबाबतची अचूक माहिती मिळत नव्हती. यानंतर अलीकडच्या काही दिवसांचा विचार केला असता लसींचा साठा अल्प प्रमाणात होत असल्याने लसीकरणाचा वेग मंदावल्याचे दिसून आले होते. तर मध्यंतरीचा १७ हजार लसींचा साठा संपल्याने आता जिल्ह्यातील लसीकरणाला ब्रेक लागला आहे. जळगाव शहरात सलग दोन दिवस लसीकरण पूर्णपणे बंद होते. यात आज सायंकाळपर्यंत नवीन लसींचा साठा न आल्यामुळे उद्या अर्थात दिनांक २६ मे रोजी शहरातील लसीकरण बंद राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, जळगाव शहराप्रमाणेच सर्व तालुक्यांमध्येही साठा संपुष्टात आला असून फक्त आठ केंद्रांवर अतिशय अल्प प्रमाणात लस उपलब्ध आहे. यामुळे दिनांक २६ मे रोजी सर्व तालुका स्तरावरही लसीकरण बंद राहणार आहे. तर खासगी रूग्णालयाचा विचार केला असता जळगाव येथील विश्‍वप्रभा हॉस्पीटलमध्ये ४५ वर्षे वयावरील नागरिकांसाठी चार हजार लसी उपलब्ध आहेत. अर्थात, यासाठी शुल्क आकारणी करण्यात येणार आहे. या खासगी लसीकरण केंद्राचा अपवाद वगळता जळगावात बुधवारी लसीकरण पूर्णपणे बंद राहणार आहे.

Exit mobile version