Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

घाबरू नका : जिल्हा रूग्णालयात ऑक्सीजनचा पुरेसा अतिरिक्त साठा ! ( व्हिडीओ)

जळगाव, सचिन गोसावी । जिल्हा रूग्णालयात ऑक्सीजन घेऊन येणार्‍या टँकरशी संपर्क होत नसला तरी हॉस्पीटलमध्ये सुमारे १८ ते २४ तास पुरेल इतका प्राणवायूचा साठा बॅकअपच्या स्वरूपात असल्यामुळे कुणीही काळजी करू नये असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, जिल्हा रूग्णालयातील ऑक्सीजनच्या टँकमध्ये उत्पादकांकडून टँकरमधून आलेला प्राणवायू हा स्टोअर करून याला वापरण्यात येते. यात सध्याला सहा तास पुरेल इतका प्राणवायू उपलब्ध आहे. तर ऑक्सीजनचा टँकर हा आज सायंकाळपर्यंत जिल्हा रूग्णालयात येणार असल्याचे नियोजन करण्यात आले होते. तथापि, आतापर्यंत हा टँकर आलेला नसल्यामुळे जिल्हा रूग्णालयाच्या यंत्रणेवर ताण आला आहे.

या संदर्भात या संदर्भात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी माहिती देतांना सांगितले की, आम्ही सायंकाळपासून टँकरच्या ड्रायव्हरशी संपर्क साधत असलो तरी संपर्क होत नसल्याने थोडा काळजीचा विषय आहे. तथापि, कोणतीही अडचण होऊ नये म्हणून आम्ही दुसरी व्यवस्था करून ठेवलेली आहे. यात जळगावच्या औद्योगिक वसाहतीतील शिवम या ऑक्सीजन उत्पादन करणार्‍या कंपनीतून मोठे सिलेंडर भरून आणण्याची तयारी करण्यात आलेली आहे. ऑक्सीजनवर असणार्‍या प्रत्येक रूग्णाला नियमीतपणे ऑक्सीजन मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, जिल्हा रूग्णालयातील स्टोअर टँकमध्ये प्राणवायूचा साठा संपणार असला तरी यासाठी जिल्हा प्रशासनाने तातडीचे नियोजन केलेले आहे. यानुसार साधारणपणे १८ तासांपर्यंत ऑक्सीजन पुरेल इतकी व्यवस्था आतापर्यंत करण्यात आलेली आहे. यामुळे रूग्ण वा त्यांच्या आप्तांनी घाबरण्याचे कोणतेही कारण नसल्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी लाईव्ह ट्रेंडस न्यूजशी बोलतांना सांगितले आहे.

जिल्हाधिकारी अभिजीत राऊत म्हणाले की, या आधी देखील एकदा अशी स्थिती उदभवली होती. मात्र, अशा प्रकारच्या सर्व शक्यता गृहीत धरून प्रशासनाने आधीच सज्जता केली असल्यामुळे काहीही अडचण आलेली नाही. आता सुध्दा १८ ते २४ तास पुरेल इतका ऑक्सीजनचा साठा बॅक-अपच्या स्वरूपात आमच्याकडे उपलब्ध आहे. यामुळे प्रत्येक रूग्णाला पुरेसा प्राणवायू मिळेल. तसेच यामुळे रूग्ण वा त्यांच्या आप्तांनी घाबरण्याचे कोणतेही कारण नसल्याचेही जिल्हाधिकार्‍यांनी लाईव्ह ट्रेंडस न्यूजशी बोलतांना आवर्जून नमूद केले.

Exit mobile version