Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सुखद बातमी : कमी पॉझिटीव्हीटी दरात जिल्हा राज्यात दुसर्‍या क्रमांकावर

जळगाव, प्रतिनिधी । गेल्या अनेक दिवसांपासून जळगाव जिल्ह्यातील कोरोना बाधीतांच्या संख्येत लक्षणीयरित्या घट होतांना दिसत असतांनाच आता जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटीचा दर हा राज्यातील दुसर्‍या क्रमांकाचा कमी असल्याचे ताज्या आकडेवारीतून अधोरेखीत झाले आहे.

राज्याच्या आरोग्य विभागाने आज विविध जिल्ह्यांमध्ये संसर्गाचे प्रमाण अर्थात पॉझिटीव्हीटीचा दर नेमका किती आहे याची आकडेवारी जाहीर केली आहे. यात भंडारा जिल्ह्यात सर्वात कमी म्हणजे ३.४४ टक्के इतका पॉझिटीव्हीटीचा दर आहे. तर याच्या खालोखाल जळगाव जिल्ह्यात ३.८३ टक्के इतका संसर्गाचा वेग आहे. अर्थात, जळगाव जिल्ह्यातील पॉझिटीव्हीटीचा दर हा राज्यात दुसर्‍या क्रमांकाने सर्वात कमी असल्याचे या आकडेवारीतून अधोरेखी झाले आहे.

गेल्या आठ दिवसांमधील ही सरासरी आकडेवारी अतिशय महत्वाची आहे. कारण राज्यातील सरासरी पॉझिटीव्हीटीचा दर हा तब्बल ११.०६ टक्के आहे. तर अनेक जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात संसर्ग आढळून येत आहे. अगदी सातार्‍यात तर २१.९३ टक्के इतका पॉझिटीव्हीटीचा दर आहे. या पार्श्‍वभूमिवर, जळगाव जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग हा आटोक्यात आल्याचे दिसून येत आहे.

स्थानिक पातळीवर पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील व जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली लोकप्रतिनिधी व प्रशासनाने एकदिलाने काम केले असून याला आरोग्य यंत्रणा व लोकसहभागाची साथ मिळाल्याने जिल्ह्यातील संसर्गाचे प्रमाण हे आता बर्‍यापैकी आटोक्यात आल्याचे चित्र आहे. अर्थात, असे असले तरी कुणीही गाफील न राहता सर्व नियमांचे पालन करावे हे देखील तितकेच आवश्यक आहे.

Exit mobile version