Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

तीन दिवसानंतर ‘अनलॉक’ : नवीन नियमावली अंमलात !

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा प्रशासानाने लावलेल्या तीन दिवसांच्या निर्बंधानंतर मध्यरात्रीपासून पुन्हा एकदा अनलॉक Unlock करण्यात आले आहे. यामुळे आज सकाळपासून दैनंदिन जीवन पूर्वपदावर आल्याचे दिसून येत आहे. तर जिल्हाधिकार्‍यांनी जारी केलेले नवीन नियम देखील आजपासून अंमलात आले आहेत.

जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रकोप लक्षात घेता जिल्हाधिकार्‍यांनी २७ मार्च रोजी मध्यरात्रीपासून तीन दिवसांचा मिनी लॉकडाऊन जाहीर केला होता. यात अत्यावश्यक सेवांचा अपवाद वगळता संपूर्ण बाजारपेठ बंद करण्यात आली होती. या तीन दिवसांमध्ये अपवाद वगळता लॉकडाऊनला जिल्हाभरातून अतिशय उत्तम असा प्रतिसाद मिळाला. हा लॉकडाऊन काल मध्यरात्री संपला. अर्थात, आता जिल्ह्यातील जनजीवन पूर्वपदावर Unlock आले आहे. मात्र याआधीच जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सायंकाळी नवीन निर्बंध लागू करण्याचे नोटिफिकेशन जाहीर केले आहे. यामुळे जिल्ह्यात मध्यरात्रीपासून अनलॉक झाले असले तरी आता नागरिकांसाठी नवीन नियमावली आखून देण्यात आली असून याचे पालन करण्याचे अनिवार्य करण्यात आले आहे.

जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी जाहीर केलेले निर्बंध हे खालील प्रमाणे आहेत.

हे राहणार बंद

सर्व आठवडे बाजार, सर्व शाळा, महाविद्यालये, विद्यापीठ, खासगी क्लासेस, सिनेमागृहे, नाट्यगृहे, बगिचे, क्रीडा स्पर्धा, प्रदर्शने, मेळावे, जिम, व्यायामशाळा, खेळांची मैदाने, स्वीमिंग टँक, यात्रा, दिंड्या, उरुस, धार्मिक कार्यक्रम, लॉन्स, मंगल कार्यालये हे सर्व बंद राहणार आहे.

यांना परवानगी

जिल्ह्यातील सर्व भाजीपाला, फळे, किराणा दुकाने, दूध विक्री केंद्र सकाळी ७ ते संध्याकाळी ८ वाजेपर्यंत सुरू ठेवता येईल. सर्व नॉन इसेन्शियल दुकाने मात्र सकाळी ७ ते रात्री ७ पर्यंतच सुरू ठेवता येणार आहेत. हॉटेल, खानावळी, परमिट रूम, बार सकाळी ९ ते रात्री ८ वाजेपर्यंत सुरू असतील. होम डिलिव्हरी रात्री १० वाजेपर्यंत देता येईल. या ठिकाणी ५० टक्के उपस्थितीची अट लागू असेल.

यांना सशर्त परवानगी

जिल्हाधिकार्‍यांनी काही बाबींना Unlock सशर्त परवानगी दिली आहे. यात भाजी मंडई ५० टक्के क्षमतेने, एका आड एक, बाजार समित्या नियम पालन करून खुली राहणार आहे. हॉटेल बार बैठक व्यवस्थेच्या ५० टक्के क्षमतेने, शिक्षणाची सुविधा ऑनलाइन द्वारे, वाचनालये, अभ्यासिका ५० टक्के क्षमेतेने सुरू राहतील. धार्मिक स्थळे ५ लोकांच्या मर्यादेच्या उपस्थितीत केवळ पूजा-अर्चा करण्यासाठी. अंत्यविधीला २० लोकांनाच उपस्थित राहता येईल. लग्नसमारंभाला २० लोकांची उपस्थिती, वैधानिक सभांना ५० लोकांच्या मर्यादेत परवानगी, निदर्शने, मोर्चे, रॅलींना बंदी मात्र, ५ जणांच्या उपस्थितीत पोलिस परवानगीने निवेदन देता येईल. खासगी आस्थापना, कार्यालये ५० टक्के क्षमतेने सुरू राहतील.

दरम्यान, शासकीय व निमशासकीय कार्यालये आरोग्य सेवा व अत्यावश्यक सेवा वगळून ५० टक्के कर्मचार्‍यांची उपस्थितीबाबत प्रमुखाने निर्णय घ्यायचा आहे. सर्व शासकीय कार्यालयांत कामानिमित्त येणार्‍या अभ्यांगतांची गर्दी नियंत्रित करण्यासाठी अतिमहत्त्वाच्या कामाशिवाय अभ्यंगतांना प्रवेश असणार नाही. ज्यांना बैठकीसाठी उपस्थित राहण्याबाबत कळवण्यात आले असेल त्यांना विभागाच्या प्रमुखांच्या पासनेच प्रवेश दिला जाईल.

नियम तोडल्यास दंड

जिल्ह्यात रात्री १० ते सकाळी ७ वाजेपर्यंत संचारबंदी घोषित करण्यात आली आहे. ५ पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. या नियमाचे उल्लंघन केल्यास प्रति व्यक्ती एक हजार रुपये दंडाची आकारणी करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने कळविले आहे.

Exit mobile version