Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

निर्बंधांच्या नियमांचे उल्लंघन करून रंगतोय क्रिकेटचा डाव !

जळगाव प्रतिनिधी । राज्य शासनाने आधीपासूनच पटांगणावरील खेळांवर बंदी लादली असतांना येथील राजे छत्रपती संभाजी महाराज नाट्यगृहाच्या समोर असलेल्या मोकळ्या जागेत क्रिकेटचा डाव रंगत असल्याचे दिसून आले असून संबंधीतांना मज्जाव करण्यात यावा अशी मागणी होत आहे.

याबाबत वृत्त असे की, राज्य शासनाने ब्रेक द चेनच्या अंतर्गत सर्व प्रकारच्या क्रीडा प्रकारांवर बंदी घातली आहे. तर आजपासून याबाबतचे नियम अजून कडक करण्यात आले आहेत. मात्र अनेक ठिकाणी या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे दिसून येत आहे. असाच प्रकार गेल्या काही दिवसांपासून शहरातील राजे छत्रपती संभाजी महाराज नाट्य संकुलाच्या बाजूला आढळून येत आहे.

या नाट्य संकुलाच्या बाजूला महसूल प्रशासनाची खूप मोठी मोकळी जाता असून येथे नेहमी काही तरूण क्रिकेटसह अन्य खेळ खेळत असतात. शहरात मैदानांची कमतरता असल्याने त्यांच्या या ठिकाणी खेळण्यावर कुणीही आक्षेप घेऊ शकत नाही. मात्र कोरोनाच्या काळात शासनाने बंदी लादली असतांना जमावबंदी आणि फिजीकल डिस्टन्सींगचे उल्लंघन करून क्रिकेट खेळले जात असल्याचा प्रकार काही दिवसांपासून सुरू आहे.

या संदर्भात माहिती मिळाल्यानंतर प्रस्तुत प्रतिनिधीने आज सकाळी जाऊन पाहिले असता मोठा जमाव क्रिकेट खेळत असल्याचे दिसून आले. धक्कादायक बाब म्हणजे यात एक पोलीस कर्मचारी हा ड्रेसवर खेळत असल्याचे दिसून आले.

कोरोनाच्या प्रतिकारासाठी सरकार आटोकाट प्रयत्न करत असून स्थानिक प्रशासनाचाही यासाठीच आटापीटा सुरू आहे. यामुळे राजे संभाजी नाट्यगृहाच्या बाजूच्या जागेवरील खेळणे बंद करावे अशी मागणी करण्यात येत आहे.

Exit mobile version