Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कोरोना हाताळण्यात राज्य सरकार १०० टक्के अयशस्वी-आ. गिरीश महाजन

जळगाव प्रतिनिधी । सर्वत्र कोरोनाचा हाहाकार सुरू असतांना याच्यावर उपाययोजना करण्यात राज्य सरकार १०० टक्के अयशस्वी ठरल्याचा आरोप करत आज माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांनी जोरदार हल्लाबोल केला. स्वत:चे अपयश झाकण्यासाठी केंद्र सरकारवर आरोप करण्याशिवाय या सरकारला काहीही येत नसल्याचा खोचक टोला देखील त्यांनी मारला. जळगाव जिल्ह्यातील कोरोनाच्या उपाययोजनांबाबत जिल्हाधिकार्‍यांशी चर्चा केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

माजी मंत्री आ. गिरीशभाऊ महाजन यांच्या नेतृत्वाखालील भाजपच्या शिष्टमंडळाने आज जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांची भेट घेऊन कोरोनाच्या उपाययोजनांबाबत सविस्तर चर्चा केली. यानंतर पत्रकारांशी बोलतांना आ. गिरीशभाऊंनी जोरदार टोलेबाजी केली. ते म्हणाले की, सध्या कोरोनाच्या रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून मृत्यू देखील जास्त होत आहेत. रूग्णांना बेड मिळण्यासाठी सुध्दा अडचण होत असून रेमडेसिवीर सारख्या इंजेक्शनचाही प्रचंड प्रमाणात तुटवडा भासत आहे. यामुळे कोरोनाची परिस्थतीत राज्य सरकारला हाताळता आली नाही. तर राज्य सरकारनेच उच्च न्यायालयात स्थिती हाताबाहेर गेल्याची कबुली दिली असल्याकडे आ. महाजन यांनी लक्ष वेधले.

आ. गिरीशभाऊ महाजन पुढे म्हणाले की, जिल्ह्यात कोरोनाच्या रूग्णांना कोणत्याही दर्जेदार सुविधा उपलब्ध नाहीत. अनेक कोविड केअर सेंटर्समध्ये असुविधा आहेत. बर्‍याच ठिकाणी तर साधा पंखासुध्दा नाही. असे असतांनाही राज्यातील सत्ताधारी हे मात्र सातत्याने केंद्र सरकारकडे बोट दाखविण्याचे काम करत आहेत. खरं तर, केंद्राने महाराष्ट्राला मदत देण्यात हात आखडता घेतला नाही. राज्याला रेमडेसिव्हीर इंजेक्शन मिळालेत, ऑक्सीजनसाठी मदत देखील मिळाली असली तरी राज्य सरकारला मात्र योग्य नियोजन करता आले नसल्याची टीका आ. महाजन यांनी केली.

याप्रसंगी आ. गिरीशभाऊ महाजन यांनी राज्य सरकार हे वसुलीबाज असल्याची टीका केली. ते म्हणाले की, एखादा जबाबदार अधिकारी हा थेट गृहमंत्र्यांवर आरोप करत असल्याची बाब ही अतिशय गंभीर आहे. यामुळे हे सरकार वसुलीचे काम करत असल्याचा आराप आ. महाजन यांनी याप्रसंगी केला.

याप्रसंगी भाजपचे जिल्हाध्यक्ष आ. राजूमामा भोळे, महानगराध्यक्ष दीपक सुर्यवंशी, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष लालचंद पाटील, स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे-पाटील, माजी महापौर भारतीताई सोनवणे, माजी जि.प. उपाध्यक्ष नंदू महाजन आदींची उपस्थिती होती.

Exit mobile version